कथा सशांना जन्म देणाऱ्या बाईची....पण कहाणीत एक जबराट ट्विस्ट आहे राव !!

एखाद्या बाईनं एकाच वेळी ७ मुलांना जन्म दिला, जुळ्यांना जन्म दिला, कधी कधी दुर्दैवाने विकृत मुलाला जन्म दिला, अशा बातम्या तर आपण नेहमीच ऐकतो. पण एखाद्या बाईने चक्क सशाला जन्म दिल्याची बातमी कधी ऐकली होती का? ऐकूनच तुमचा विश्वास बसणार नाही. पण इतिहासात अशी एक नोंद सापडते बरं. चला तर आज जाणून घेऊया या महिलेने चक्क सशांना जन्म नक्की दिला तरी कसा !!
गोष्ट आहे १८ व्या शतकातली, इंग्लंडमध्ये घडलेली. तेव्हा ‘मेरी टॉफ्ट’ (१७०१-१७६३) या महिलेनं मृत सशांना जन्म दिला. ह्या अजब प्रकारामुळे तिच्या घरच्यांनी स्थानिक सर्जन ‘जॉन हॉवर्ड’ यांना बोलावलं. त्यांनी स्वतः बघितलं की मेरीने एक नाही, दोन नाही, तब्बल ९ मृत सशांना जन्म दिला आहे.
जॉन हॉवर्डने या घटनेला तत्कालीन डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं. ही बातमी वाऱ्यासारखी इंग्लंडभर पसरली. या बातमीचा परिणाम इतका झाला की इंग्लंडच्या राजाने २ सर्जन्सना याकडे विशेष लक्ष द्यायचे आदेश दिले. या दोन्ही सर्जन्सना मेरीने तिने सशांना जन्म कसा दिला याबद्दल माहिती दिली.
त्याकाळी असा एक समज होता की गरोदर असताना बाईला पडणारी स्वप्नं, आजूबाजूच्या गोष्टी आणि घरातल्या पाळीव प्राण्यांचा परिणाम गर्भधारणेवर होतो. मेरीच्या मते तिनं गरोदरपणात ससा पकडण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आणि ससा तिच्या मांडीवर आहे अशी स्वप्नं पाहिली. यामुळेच तिच्या पोटी ससे जन्मले असं तिचं म्हणणं होतं. यावर कडी म्हणजे नंतर तिने त्या काळातल्या नामवंत सर्जन्सच्या समोर सशांना जन्म देऊनही दाखवलं.
त्याकाळी पालकत्व सिद्ध करण्यासाठी काही डीएनए टेस्ट नव्हती, पण एक भन्नाट आणि विचित्र पद्धतीनं त्या सर्जन्सनी मृत ससे खरोखरच तिच्या पोटातून आले आहेत हे तपासलं. या शहाण्या लोकांनी त्या मेलेल्या सशांची फुफ्फुसं पाण्यात टाकून पाहिली. त्यांचं म्हणणं होतं की तिनं या सशांना जन्म दिला नसेल, तर हे ससे आधी जिवंत असतील आणि जिवंत साश्यांची फुफ्फुसं पाण्यावर तरंगू शकतात. आजच्या काळात हे अगदीच येडचाप वाटेल पण त्याकाळी या तर्काला गंभीरपणे घेतलं गेलं.
सरतेशेवटी हे सिद्ध झालं होतं की मेरी ही सशांना जन्म देणारी इतिहासातील पहिली महिला आहे. याला घाईघाईत मान्यता दिली असावी असं वाटतं, कारण त्याकाळात सुद्धा ट्रेंडिंग होणं हा प्रकार अस्तित्वात होता. आणि डॉक्टरांना हा विषय ट्रेंडमधून घालवायचा नव्हता.
पण म्हणतात ना खोटं कितीही लपवलं तरी लपत नाही. शेवटी तिचं बिंग फुटलं.
तर, झालं असं की ती इंग्लंडभर प्रसिद्ध झाली, लोक तिच्याबद्दल चर्चा करू लागले, डॉक्टरांनी तर या गोष्टीला अंधपणे मान्यता सुद्धा दिली होती. पण यात काहीतरी काळे आहे याचा संशय अनेकांना होता. यातूनच ‘थॉमस आँस्लो’ या राजकारण्याने तिच्याविरुद्ध तपास मोहीम सुरु केली. तिला लंडनच्या एका घरात ठेवण्यात आलं. तिच्यावर करडी नजर ठेवण्यात आली. आता हळूहळू या गोष्टीतलं गुपित फुटणार होतं.
तपास मोहिमेतून हे समोर आलं की मेरीच्या पतीने मागच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ससे विकत घेतले आहेत. हे एकीकडे समजल्यानंतर दुसरीकडे या केस मधला पहिला साक्षीदार डॉक्टर ‘जॉन हॉवर्ड’ याने कबूल केलं की त्याला याबद्दल खोटं बोलण्यासाठी मेरीच्या नणंदेने पैसे चारले होते. मेरीने सुरुवातीला हे साफ खोटं असल्याचं सांगितलं, पण शेवटी तिला धमकी देण्यात आली की गर्भाशयाचं परीक्षण करण्यासाठी तिला अत्यंत भयानक ऑपरेशन मधून जावं लागेल. मग काय, तिने सगळं कबूल केलं.
हे ससे जन्मले कसे ?
तिने मृत सशाचं धड आणि मांजरीचं शरीर एकत्र जोडून ते आपल्या योनीमार्गात सारलं होतं. यानंतर असा भास निर्माण केला की या प्राण्याला आपणच जन्म दिला आहे. हे यामागील सत्य होतं. तिने या प्रकाराने तत्कालीन वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांची दिशाभूल केली होती. या सर्वांचा शेवट मेरीला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात झाला.
तिने हे सगळं का केलं याला उत्तर एकच - प्रसिद्धीसाठी. जसं आजच्या काळात लोक सोशल मिडियावर काहीही करून व्हायरल होतात, तसाच काहीसा हा प्रकार होता. तरी मेरीने जे केलं त्याचा विचारही कोणी केला नसेल. एक प्रकारे हा ‘ट्रेंडींग’चाच सर्वात जुना इतिहास मानता येईल.