आता मुंबई आणि पुण्यात बॉयफ्रेंड सुद्धा उधारीवर मिळेल....जाणून घ्या या नवीन अॅप बद्दल !!

मंडळी, बदलत्या जमान्यासोबत काही संकल्पना बदलत जातात. आपण घर भाड्याने घेतो, गाडी भाड्याने घेतो किंवा वस्तू भाड्याने घेतो. पण आता बदलत्या संकल्पनेनुसार तुम्ही चक्क बॉयफ्रेंडसुद्धा भाड्याने घेऊ शकता. ही गंमत नाही राव. तुम्ही जर मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या असाल, तर तुम्हाला ‘रेंट अ बॉयफ्रेन्ड’ या अॅपद्वारे चक्क बॉयफ्रेंड भाड्याने घेता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया, ही ‘भाडोत्री बॉयफ्रेंड योजना' आहे तरी काय ??
त्याचं काय आहे ना, तरुणांमध्ये हल्ली डिप्रेशनचं प्रमाण वाढलं आहे. एकटेपण, नैराश्य या कारणांमुळे अनेकजण आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. पण मुंबई-पुण्यासारख्या धावत्या शहरांमध्ये प्रत्येकजण आपापल्यात गुंतलेला असताना एकमेकांत संवाद होणं कठीण असतं. म्हणूनच कौशल प्रकाश या तरुणाने हे आगळंवेगळं अॅप तयार ककेलं आहे.
या अॅपमध्ये तुम्ही ६ हँड्सम बॉयफ्रेंड्सचे फोटो पाहू शकता. तुम्हाला यातून एकाची निवड करता येईल. आता यात काही जणांचे उघडे फोटो का दाखवले असावेत असाही आपल्याला प्रश्न पडू शकतो. पण तो प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न आहे. असो...
१५ ऑगस्ट रोजी हे अॅप लाँच करण्यात आलंय. या अॅपचा कर्ताधर्ता कौशल प्रकाश स्वतः ३ वर्ष डिप्रेशनमध्ये होता. त्यातून बाहेर पडल्यावर त्याला ही आयडिया सुचली. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्यापेक्षा एखाद्या मित्र-मैत्रिणीकडे मन मोकळं केल्यास नैराश्य कमी व्हायला मदत होऊ शकते असं तो म्हणतो. मानसोपचारतज्ज्ञ आपलं ऐकून घेण्याचंच काम करत असतो. जर हेच काम जवळच्या व्यक्तीने केलं तर त्याचा परिणाम जास्त होईल असंही त्याचं म्हणणं आहे.
राव, हल्लीच्या जमान्यात ‘खांदा देणं’ हा एक नवीन प्रकार उदयास आलाय. म्हणजे खांदा देऊन स्मशानात नेणं नव्हे, तर समोरच्याला बोलून मोकळं करण्यासाठी दिलेला खांदा या अर्थी. तर अशाच प्रकारात हा अॅप मोडत असावा असं दिसतंय. पण हा खांदा तुम्हाला फुकट मिळणार नाही. तर त्यासाठी अर्थातच तुम्हांला तुमचा खिसा हलका करावा लागेल.
किती पैसे आकारले जातील ?
या अॅपच्या माध्यमातून मिळणारे बॉयफ्रेंड हे २२ ते २५ वर्षं वयोगटातले आहेत. तुम्ही जर सामान्य व्यक्तीची निवड केलीत, तर तासाला ३०० ते ४०० रुपये द्यावे लागतील. तुम्ही जर सेलेब्रिटीला निवडलंत तर तासाला ३००० रुपये द्यावे लागतील. आणि जर मॉडेलला निवडलं तर ताशी २००० पर्यंत भाडे लागेल. या सोबतच येण्याजाण्याचा खर्च, खाण्याचा खर्च इत्यादी तुमच्या खिशातूनच करावे लागतील.
आता मुलांसाठी थोडं. या अॅप मध्ये मुलं बॉयफ्रेंड म्हणून रजिस्टर होऊ शकता. यासाठी तुम्ही १० वी किंवा १२ वी पास असलं पाहिजे.
अशा भाडोत्री बॉयफ्रेंडची संकल्पना ही जगभर पसरलेली आहे. एवढंच काय चीनसारख्या देशांमध्ये भाडोत्री गर्ल्डफ्रेंड सुद्धा मिळते राव. आपल्याकडे गेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ला गुडगावच्या शकुल नावाच्या मुलाने अशीच ‘एकदिवशीय बॉयफ्रेंड योजना’ काढली होती. याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी आमचा हा लेख वाचा. ते जाऊदे, अमेरिकेत स्नगल बडीज नावाची वेबसाईट तुम्हाला प्रेमाने कुशीत घेऊन झोपण्याचे पार्टनर भाड्याने देते. त्यात मुलं आणि मुली दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
आता (सिंगल) मुलांना वाटेल की भाड्याने गर्लफ्रेंडची योजना कधी येणार. तर त्याचं काय आहे ना भाऊ, तेही लवकरच येऊ शकतं. थोडं धीर धारा.
तर मंडळी, ही आयडिया किती काम करते हे भविष्यच सांगेल. पण त्याआधी तुम्ही आम्हाला सांगा या अॅपबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ?