नव्या कामाची सुरुवात सोमवारपासूनच का करायची असते ? हे पाहा शास्त्रीय उत्तर !!

‘जिममध्ये पैसे भरलेत, पण सोमवारपासून जॉईन करेन म्हणतो’ असं तुमचं होतं का? सोमवारी सुरुवात करायची तर असते, पण तो सोमवार काही केल्या येत नाही. मग पैसेही जातात आणि व्यायामही होत नाही.
वजन कमी करायचं आहे, डायटिंग प्लॅन रेडी आहे, पण सोमवारपासून सुरुवात करेन.. आणि सोमवारीच भूक आवरत नाही. असं तुमचं होतं का?
तर, आपल्यामध्ये बदल घडवायचे आहेत, नवीन सुरुवात करायची आहे, स्वप्न पूर्ण करायचे आहेत हे सगळं आपल्याला मान्य असतं, पण तो दिवस काही येत नाही. आज हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ज्या सोमवारच्या नावाने आपण सगळं काही पुढे ढकलतो, तो सोमवारच नव्या सुरुवातीसाठी सर्वोत्तम दिवस असल्याचं सिद्ध झालंय.
त्याचं काय आहे ना, सोमवारपासून आठवड्याची सुरुवात होते. आठवड्याची सुरुवात जर तुम्ही नव्या सवयीने केलीत तर तुमच्या उद्देशावर ठाम राहण्यासाठी ते प्रेरणादायी ठरतं. याचा थेट संबंध आपल्या मानसशास्त्राशी आहे. आपण जुनं मागे टाकून नवीन सुरुवात करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होत असतो.
अमेरिकेतल्या अभ्यासकांनी यावर संशोधन केलं आहे. अभ्यासासाठी त्यांनी एक परिक्षण केलं आणि कोणती व्यक्ती बदल लवकर आत्मसात करते हे तपासण्यात आलं.
तर, त्यांनी परिक्षणात सहभागी व्यक्तींना पहिलाच प्रश्न विचारला – ‘तुमचं ध्येय काय ?’. प्रत्येकाने आपापलं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांचे गट पाडण्यात आले. पहिल्या गटाला त्यांनी हे गृहीत धरायला सांगितलं की तुम्ही ९ वर्षांनी एका नवीन घरात राहायला आलेला आहात. दुसऱ्या गटाला त्यांनी सांगितलं की तुम्ही दरवर्षी नवीन घरात शिफ्ट होत आहात. असं समजा की तुम्ही आता आणखी एका नवीन घरात आलेले आहात.
अभ्यासकांनी यानंतर दोन्ही गटांना प्रश्न विचारला की तुम्ही नवीन घरात आल्यानंतर तुमचं ध्येय साधण्यासाठी तुम्हाला किती प्रमाणात हुरूप आला? यावर पहिल्या गटाने सांगितलं की नवीन सुरुवात करण्यासाठी त्यांना काहीच अडचण आली नाही. उलट त्यांना जास्त प्रेरणा मिळाली. तर दुसऱ्या गटाला फारसं नवीन जाणवलं नाही.
दोन्ही गटांमध्ये फरक होता. याचं कारण म्हणजे पहिला गटातील लोक ९ वर्षांनी दुसऱ्या घरात जात होते. तर दुसऱ्या गटातील लोकांना दरवर्षी घर बदलण्याची सवय होती.
जेवढी मोठी नवीन सुरुवात असते, तेवढीच मोठी त्या नवीन सवयीला अंगीकारण्यासाठीची प्रेरणा असते हे यातून सिद्ध झालं. नवीन वर्षाची सुरुवात, तुमचा वाढदिवस, कामाचा पहिला दिवस, महिन्याचा पहिला दिवस, हे दिवसही तुम्हाला निवडता येतील. पण सोमवारला तोड नाही राव.
तर, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि ध्येय साधण्यासाठी आजचा नवीन सोमवार उगवलेला आहे. मग आज कोणती नवीन सुरुवात करणार? आम्हाला नक्की सांगा !!