computer

तब्बल ११वर्षं घराजवळच राहूनही न सापडलेल्या बेपत्ता बाईची गोष्ट नक्की काय आहे?

आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर हरवलेले लोक कित्येक वर्षानी सापडले असे अनेक किस्से आपण बघितले असतील. कधी ते दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात सापडतात. काही वेळा प्रेमविवाह करण्यासाठी निघून गेलेल्या लोकांचा देखील कित्येक वर्षांनी पत्ता लागतो. सहसा पळून गेलेली व्यक्ती आपल्या घरापासून एवढी लांब जाते की त्यांना शोधणं कठीण होऊन बसतं. पण घराजवळ राहूनच एक महिला तिच्या कुटूंबियांना ११ वर्षे सापडली नाही, अशी घटना तुमच्या पाहण्यात आली आहे का? पुढे वाचा मग कळेल तुम्हाला.

प्रेमात असलेल्या लोकांना आपले प्रेम टिकवण्यासाठी नाना तर्हेच्या डोक्यालिटी कराव्या लागतात. हे प्रकरण देखील त्याचाच भाग आहे. ही सिनेस्टाईल स्टोरी केरळमध्ये २०१० साली सुरू झाली. सजीता नावाच्या १९ वर्षीय मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली. तिला अनेक ठिकाणी शोधण्यात आले, पण ती सापडली नाही.

मग पत्ता कसा लागला? तर रहमान नावाचा एक माणूस आपल्या घरातून यावर्षी मार्च महिन्यात बेपत्ता झाला होता. त्याला त्याच्या कुटूंबाने शोधून काढले पण तो काय घरी यायला तयार होत नव्हता. मग पोलिसांना ही गोष्ट सांगितल्यावर पोलिसांनी त्याची समजूत काढली. त्यावेळी रेहमानने सांगिलेली गोष्ट ऐकून सगळ्यांचे डोके गरगरायला लागले.

२०१० साली एकमेकांच्या प्रेमात पडलेले रहमान आणि सजीता यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण पळून जायचे कुठे तर रहमान तिला गल्लीतच असलेल्या आपल्या घरी घेऊन आला. स्वतःच्या खोलीत तिला ठेवले. पुढील ११ वर्षे तिच्या घरच्यांना काय पण एकाच घरात राहून स्वतःच्या घरच्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना पठ्ठ्याने येऊ दिली नाही. ज्या खोलीत सजीता होती तिथे त्याच्या व्यतिरिक्त कुणाला प्रवेश नव्हता. वरून घरात टॉयलेट नसल्याने रात्री खिडकीतून निघून सजीताला जावे लागत असे.

एवढा सगळा जुगाड ११ वर्षे चालवल्यावर रहमान मात्र या सर्व प्रकाराला कंटाळला होता. शेवटी त्याने पण स्वतःचे घर सोडून इतर कुठे निघून जाण्याचा निर्णय घेतला, पण तो काय जास्त दिवस लपून राहू शकला नाही. अशाप्रकारे हे जोडपे जगासमोर आले आहे. सर्व प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्या दोघांना सोबत राहण्याची परवानगी दिली आहे.

 

रहमान आणि सजीता यांचे प्रकरण ऐकल्यावर मराठीतली जुनी म्हण आठवल्याशिवाय राहत नाही - 'काखेत कळसा अन् गावाला वळसा'.

सबस्क्राईब करा

* indicates required