computer

हवेत उडणारा पिझ्झा पाह्यला असेल, पण उडता डोसा कधी पाह्यला आहे का?

काही दिवसांपूर्वी तुम्ही एका बुलेट हॉटेलबद्दल वाचले होते, ज्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बुलेट थाळीचा अनोखा उपक्रम राबवला होता. तो खूप चाललाही होता. मोठमोठे हॉटेल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्या अनेक योजना राबवत असतातच. पण एका रस्त्यावरच्या डोसा विक्रेत्याने आपल्या वेगळ्या शैलीनी सगळ्यांनाच आकर्षित केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर नुसता धुमाकूळ घालतोय.

एकदा तो व्हिडीओ बघून घ्याच.

मुंबईच्या स्ट्रीट फूडचे देशभरात सगळ्यात जास्त आकर्षण आहे. कुठलाही पदार्थ तिथे मिळत नाही असं होतच नाही आणि तेही अगदी रास्त किमतीत. रोज कितीतरी लोक आपलं पोट इथे भरत असतात. जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी लांबून लांबून ग्राहक येतात. साऊथ मुंबईच्या मंगलदास मार्केटमध्येही असे अनेक विक्रते आपली  गाडी घेऊन उभे राहतात. तिथलाच श्री बालाजी डोसावाला त्याच्या डोसा उडवण्याच्या एका अनोख्या शैलीने एकदम प्रसिद्ध झालाय. 

'Street Food Recipes' या फेसबुकपेजने त्याचा व्हिडीओ शेयर केला आहे. डोसा उडवणारा हा डोसेवाला जेव्हा गिऱ्हाईकाला डोसा सर्व्ह करतो तेव्हा तो उडवत त्याच्या डिशमध्ये तो अलगद येऊन पडतो. हा उडणारा डोसा इतका लिलया ग्राहकाच्या डिशमध्ये  पडतो आणि तोही न तुटता. त्यासाठी तो काही वेगळं डोसा पीठ किंवा चमचे वैगेरे वापरत नाही. जेव्हा हा व्हीडीओ इंटरनेटवर शेयर झाला तेव्हा याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. आतापर्यंत तब्बल ८ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. तो व्हीडीओ अजूनही सगळीकडे शेयर केला जातोय. त्यावर चर्चा होतेय. काहीजणांना त्याची डोसा उडवायची पद्धत खूप आवडली, त्यांनी त्याचं कौतुक केलंय. तर काही जणांनी "अन्नाचा अपमान किंवा गरज नसताना का उडवायचा?" असं म्हणत नाकही मुरडली आहेत.

काहीही असो हा उडणारा डोसा सध्या प्रसिद्ध होतोय हे खरं. शेवटी ग्राहकांना आकर्षित करायला त्याने हा सराव केला असेल तर त्यात काही चूक की बरोबर हे कोण ठरवणार? तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा.

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required