पालक, शिक्षक, पोलीस आणि समाजाला हादरवून सोडणारं बॉईज-लॉकरुम प्रकरण काय आहे?

समजा, कोरोना विषाणूच्या भयाने घरात बसलेल्या मुलांनी वेळ घालवण्यासाठी एखादा इन्स्टाग्राम ग्रुप सुरू केला, आणि तो कोरोनापेक्षा भयानक वेगाने पसरत गेला, तर?... कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी निर्माण करणारी लस शोधण्यात तमाम संशोधनक्षेत्र गर्क झाले आहे. या विषाणूने तर उघडकीस येताच पहिला बळीदेखील घेतला आहे. धक्कादायक म्हणजे, या विषाणूचा फैलाव विशीच्या आतल्या- शाळकरी मुलांमध्येच सुरू झाला, आणि त्या वयाच्या मुलांमध्येच त्याने हातपाय पसरले. बॉईजलॉकरुम हे या विषाणूचे नाव...
इन्स्टाग्राम ग्रुपवर फैलावलेल्या या विषाणूने दिल्लीच्या उच्चभ्रू वर्गातील शाळकरी मुलांमधील मानसिक विकृती हेरून त्यांच्या मनाचा ताबा एवढ्या झपाट्याने घेतला, की पालक, शिक्षक, पोलीस, आणि समजही या विकृतीच्या साथीने हादरून गेला. हातात स्मार्टफोन आणि भरपूर मोकळा वेळ असला, थेट भेटीगाठी बंद असल्या, की मन मोकाट सुटते, तसेच झाले. लॉकडाऊनमुळे घराच्या खोलीतच बंद झालेल्या मुलांची मने अशीच मोकाट सुटली, आणि या विकृत विषाणूचा जन्म झाला. शाळकरी मुलांच्या मनात मुलींविषयी आकर्षण नैसर्गिक असू शकते. पण आकर्षणातून जन्माला येणाऱ्या लैंगिक विकृतीला बॉईजलॉकरूम ने दरवाजे खुले करून दिले. या विषाणूच्या बातम्या एव्हाना देशभर फैलावल्या आहेत. पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या मुलांच्या मोबाईलमधील गप्पांचा मजकूर पाहून समाज हादरून गेला आहे...
तळव्याएवढा स्मार्टफोन एवढ्या झपाट्याने एखाद्या विषाणूचा फैलाव करू शकतो का, असा प्रश्न याआधी कधी पडला नसेल. व्हायरस हा शब्द तंत्रज्ञान क्षेत्राला नवा नाही. पण स्मार्टफोनच्या अँटीव्हायरसच्या संरक्षक भिंती तोडून बॉईजलॉकरूमचा हा व्हायरस फैलावला, आणि त्याने पहिला बळीदेखील घेतला.
या प्रकरणात गुंतलेल्या शाळकरी मुलांचा शोध सुरू झाल्यावर आता एका भीतीचे सावट यातील सहभागी मुलांवर दाटले आहे. ते सहाजिकही आहे. आपल्या गमतीगंमतीतल्या या विकृत उद्योगाचा पर्दाफाश झाल्यामुळे ही वेळ आली. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने गुरगावमध्ये त्याच्या ११ व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या केली. आता हे प्रकरण गंभीर वळण घेतंय. कारण त्याच्या स्मार्टफोनवरील तपशिलाच्या मुळाशी जाऊन या ग्रुपवरील मुले आणि त्यांच्या गप्पांचे विषय़ शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
या विषाणूची पाळेमुळे आणखीही अनेक प्रकरणांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. काही महिन्यांपूर्वी, मीटू नावाचा एक हॅशटॅग कमालीचा ट्रेंड झाला होता, ते तुम्हाला आठवत असेलच. या मुलाच्या आत्महत्येच्या मुळाशी त्याचे धागेदोरे जोडले गेले आहेत, असे म्हणतात.
धक्कादायक म्हणजे, बॉईजलॉकरूमच्या विषाणूचा फैलाव सुरू झाल्यावर, शाळकरी वयातल्याच मुलींनी देखील गर्ल्सलॉकरूम नावाचा इन्स्टाग्राम ग्रुप सुरू केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. मुलांनी ज्या चवीने विकृत लैंगिक गप्पा मारल्या, त्याच प्रकारे मुलींनीही या ग्रुपवरून लैंगिक गप्पा मारल्याचे उघड झाले आहे. त्याचे स्क्रीनशॉटस विषाणूच्या वेगाने फैलावले.
सोशल मीडीया ही शक्ती असली, तरी ती कोणाच्या हातात गेली की कसे रूप घेईल सांगता येत नाही. बॉईजलॉकरूम आणि गर्ल्सलॉकरूमच्या विषाणूसोबत आणखीही काही निद्रिस्त व्हायरस उघड्यावर येतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
लेखक : दिनेश गुणे