computer

वॉचमन ते IIM मध्ये प्राध्यापक...या सामान्य माणसाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे!!

छोट्याश्या झोपडीत राहणारा मुलगा आज IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करतोय. ही यशोगाथा आहे रणजित रामचंद्रन यांची. कठीण परिस्थितीतही केवळ दुर्दम्य इच्छा असल्यावर माणूस स्वतःचे स्थान कसे बनवतो याची ही कहाणी. नुकतेच त्यांनी फेसबुकवर फोटोसहित त्यांचा खडतर प्रवास शेयर केला आहे.  लहानपणी ते राहत होते त्या वीट आणि प्लास्टिकचे छप्पर असलेले झोपडीवजा घराचा फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे.

रणजित रामचंद्रन केरळमधील कासारगोडला बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजमध्ये रात्री गार्ड म्हणून नोकरी करायचे आणि दिवसा पायस कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेत होते. नंतर त्यांना आय.आय.टी. मद्रासमध्ये प्रवेश मिळाला.पण त्यांना फक्त मल्याळम भाषा माहित होती, म्हणूनच  त्यांनी पीएचडी सोडण्याचा विचार केला. पण त्यांचे गुरू डॉक्टर सुभाष यांनी त्यांना समजावून सांगितले व Phd पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. रामचंद्रन यांनी कठीण परिस्थितीत झगडत मागच्या वर्षी डॉक्टरेट पूर्ण केली. सध्या ते आयआयएम रांची येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात.

२८ वर्षीय रामचंद्रन यांचा हा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी अगदी बिकट परिस्थिती होती. वडील टेलर म्हणून काम करायचे तर तर आई मनरेगा अंतर्गत रोजंदारीवर मजुरी काम करायची. इतकी गरिबी होती की शिक्षण पूर्ण करणे जमत नव्हते. ते तिघे भावंड आणि आईवडील हे एक झोपडीवजा घरात राहायचे. कसेबसे पैसे पुरायचे. एक वेळ तर अशी आली होती की शिक्षण सोडण्याचा विचार आला. पण कुटुंबातील सर्वांनी त्यांना प्रोत्साहन दिले व पुढे अभ्यास चालू ठेवायला सांगितले.

आज मागे वळून पाहताना त्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटतो. अनेकांनी त्यांची पोस्ट वाचल्यानंतर त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. केरळचे अर्थमंत्री टीएम थॉमस यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले. इच्छा असेल तर तिथे नक्की मार्ग मिळतो. अनेकांना यातून प्रेरणा  मिळावी म्हणून त्यांनी ही कहाणी सर्वांसोबत शेयर केली आहे असे रामचंद्रन सांगतात.

खरंच रणजित रामचंद्रन यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. सामान्य गार्ड ते IIM प्राध्यापक हे सोपे नाही. बोभाटातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required