computer

आपली पेन्शन खर्ची घालून या व्यक्तीने पूर्ण केलाय १४ वर्षे रखडलेला पूल !!

एखादं सरकारी काम नेमकं सुरू कधी होणार, आणि ते पूर्णत्वाला कधी जाणार, याचा अंदाज लागणं देवालाही कठीणाय मंडळी.‌ अशात आपल्यासारख्या सामान्यांच्या हातात असतं ते फक्त वाट बघणं आणि तक्रारी करणं. पण एक गृहस्थ असे आहेत ज्यांनी तब्बल १४ वर्षे अर्धवट राहिलेला पूल आपली सगळी पेन्शन खर्ची घालून पुर्ण केलाय!

गंगाधर राऊत नावाचे हे गृहस्थ ओडिशातील कानपूर गावचे रहिवासी आहेत. २००५ मध्ये हा पूल बांधण्यासाठी १ लाख रुपये निधी मिळाला होता. पण निधीच्या कमतरतेमुळे पूलाच काम रखडलं. थोड्या वर्षांनी पुलासाठी आणखी ४ लाख रूपये मिळाले. पण यातूनही पूल अर्धवट स्थितीतच राहिला. त्यामुळे १४ वर्षे वाट बघून हतबल झालेल्या गंगाधर यांनी चक्कं आपली १२ लाख रुपयांची पेन्शनची रक्कम खर्चून हा पूल पुर्ण करण्याचा निर्णय घेतला!

या मान्सूनचा आधी हा पूल बांधून पूर्ण करण्याचा चंगच त्यांनी बांधलाय. एकूण ६ गावांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या या पूलाचा फायदा १०,००० स्थानिक गावकऱ्यांना होईल. पावसाळ्यात नदी आणि इतर धोकादायक मार्गांवरून करावी लागणारी ये-जा आता या पूलामुळे सुरक्षित आणि सुखद होणार आहे!

गंगाधर आणि त्यांच्या कुटूंबाला या रिटायरमेंट फंडातून कार घेण्याची इच्छा होती. पण ही रक्कम पूलासाठी खर्च करण्याच्या गंगाधर यांच्या निर्णयावर त्यांच्या कुटुंबाने कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यांच्या या योगदानामुळे तेथील लोक आता त्यांना एक देवदूत समजतात. लोकांनी त्याना 'ब्रिज-मॅन' असं नाव दिलंय.

मंडळी, गंगाधर यांचं हे काम अनेकांना प्रेरणा देत राहील. बोभाटा कडूनही त्यांना सलाम!

सबस्क्राईब करा

* indicates required