computer

काय म्हणता, क्रिकेटला 'वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य' घोषित करण्यात आलं होतं ?

मंडळी, लेखाचं नाव वाचूनच तुम्ही चक्रावला असाल. बरोबर ना? आज इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे, आणि एकेकाळी हाच खेळ वैज्ञानिकांनी “खेळण्यासाठी अशक्य खेळ” म्हणून घोषित केला होता? कसं शक्य आहे हे?

मंडळी, ही गोष्ट आहे १९८२ सालची. त्यावेळी कोणीतरी असा जावई शोध लावला होता की बॅट्समन जो शॉट खेळणार असतो तो आधीच ठरवला जातो. म्हणजे या समजुतीप्रमाणे सगळा सामनाच ठरलेला असतो म्हणा ना. हे मुळातच एडचाप आहे, पण या शोधावर विश्वास ठेवण्यात आला. एवढंच नाही तर हे सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग पण करण्यात आला होता.

या प्रयोगाप्रमाणे कोणत्याही माणसाला समोर घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एका सेकंदाचा एक पंचमांश म्हणजेच २०% इतका वेळ लागतो आणि एवढ्या वेळात बॉल तब्बल २० फुट अंतर कापतो. यावरून असा सिद्धांत मांडण्यात आला की एवढ्या गतीने येणारा बॉल बॅट्समनला दिसणे शक्यच नाही. त्यामुळे बॅट्समनला खेळताच येणार नाही. एकूण क्रिकेटच खेळता येणार नाही.

हा प्रयोग ज्यांनी केला त्या तज्ञांचं मत पण एकदा ऐकूया.

तज्ञांनी असं म्हटलं की ‘समोर दिसणाऱ्या दृश्यावर प्रतिक्रिया देण्याची बॅट्समनची गती ही सर्वसाधारण माणसाप्रमाणेच असते.’ म्हणजेच जो दृष्टीचा नियम वरती सांगितला आहे तो नियम बॅट्समनला पण लागू पडतो.

मग त्यांना विचारण्यात आलं की ‘बॅट्समन फास्ट बॉलिंगवर पण सफाईदारपणे खेळताना दिसतात. याबद्दल तुम्ही काय म्हणाल ?” त्यावर ते तज्ञ म्हणाले “मला माहित नाही, हे काहीतरी गूढ आहे.”

मंडळी, आजच्या जमान्यात जेवढी ही आयडिया बिनडोकपणाची वाटते, तेवढीच ती त्यावेळच्या क्रिकेटर्सना वाटली होती. खेळण्यात येणारा शॉट हा आधीच ठरवलेला असतो या गोष्टीला तर अनेक क्रिकेटर्सनी विरोध केला होता. जॉफ्री बायकॉट यांनी म्हटलं होतं की ‘फास्ट बॉलिंगचा सामना केलेला कोणताही बॅट्समन तुम्हाला सांगू शकेल की सामन्याच्या आधीच काहीही ठरवता येत नाही.’

तर मंडळी, या जावई शोधाबद्दल तुम्ही काय म्हणाल ?

सबस्क्राईब करा

* indicates required