computer

सावधान! वनप्लसच्या या फोनमध्ये आहे कपडे आणि प्लॅस्टिकच्या आरपार बघणारा एक्स-रे कॅमेरा!! 

स्मार्टफोन विश्वाचं तंत्रज्ञान अत्यंत वेगानं प्रगत होतंय मंडळी. दर ६ महिन्यांनी इथं नव्या टेक्नॉलॉजीचा ट्रेन्ड येतोय. ग्राहकाला आकर्षित करून बाजारपेठेत प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी प्रत्येक कंपनी कमी किंमतीत अधिकाधिक आणि अत्याधुनिक फीचर्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात वनप्लसने त्यांचा बहुचर्चित फ्लॅगशिप वनप्लस ८ प्रो स्मार्टफोन लॉन्च केलाय आणि वापरकर्त्यांना त्यात सापडलाय चक्कं एक्स-रे नजर असणारा कॅमेरा! 

वनप्लस ८ प्रोमध्ये क्वाड-कॅमेरा‌ सेटअप दिला गेलाय. त्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा कलर फिल्टर कॅमेरा आहे. आणि हाच कलर फिल्टर कॅमेरा काही ठराविक प्लॅ‍स्टिक आणि पातळ कपड्यांच्या आरपार फोटो आणि व्हिडिओ टिपू शकतो. याबाबतीत सर्वात आधी काही युजर्संनी Reddit वेबसाईटवरती चर्चा केली होती, त्यानंतर युट्यूबवर लोकप्रिय असलेल्या Unbox Therepy या चॅनलनेही याची सत्यतापडताळून पाहिली. काळे कापड, काळे प्लॅस्टिक बॉक्स, रिमोट अशा ठराविक गोष्टींच्या आरपारचं दृश्य या कलर फिल्टरच्या माध्यमातून कमी जास्त प्रमाणात दिसू शकतं.

हा कलर फिल्टर कॅमेरा इन्फ्रारेड सेन्सरचा वापर करून असे फोटो टिपू शकतो. नाईट व्हिजन गॉगल्समध्ये हेच तंत्रज्ञान वापरलं जातं. पण यामुळे टेक-जगतात वनप्लसवर टिका सुरू झालीय. कपडे आणि वस्तूंच्या आरपार बघणारा हा कॅमेरा सार्वजनिक जीवनात लोकांच्या प्रायव्हसीला धोका ठरू शकतो.

वनप्लसने यावर‌ लागलीच माफी मागत नवीन OTA अपडेटद्वारे हा कॅमेरा लवकरात लवकर डिसेबल केला जाईल असं सांगितलंय. पण सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून हे फिल्टर डिसेबल केलं तरी आवश्यक हार्डवेअर फोनमध्ये असल्याने अनेक स्मार्टफोन किड्यांना ते परत इनेबल करणं शक्य सहज शक्य होईल!

सबस्क्राईब करा

* indicates required