ड्रग डीलर्सला पकडायला गेले आणि पोपटाला घेऊन आले...ब्राझील पोलिसांनी पोपटाला का बेड्या ठोकल्या ??

दक्षिण अमेरिका म्हणजे ड्रग्सचा मोठा बाजार. या बाजाराचं एक प्रमुख ठिकाण म्हणजे ब्राझील. उत्तर ब्राझीलच्या भागात ड्रग डीलर्सचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे, पण पोलिसांच्या सततच्या पाठलागाने या धंद्यावर नियंत्रण येत आहे. यातूनही मार्ग काढत काही ड्रग डीलर्स हे आपलं काम साधत असतात. अशाच एका केस मध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी चक्क एका पोपटाला बेड्या ठोकल्या आहेत. पोपटाचा आणि ड्रग डीलर्सचा काय संबंध असा प्रश्न पडला ना ? संबंध फारच जवळचा आहे राव.
मंडळी, या पोपटाला खास पद्धतीची ट्रेनिंग देण्यात आली होती. पोलिसांची धाड पडणार आहे हे बघून तो ओरडायचा आणि मालकांना सावध करायचा. नुकत्याच पडलेल्या धाडीत या पोपटाने आपली कामगिरी बरोबर बजावली. तो म्हणाला "Mum, the police!". त्याने ओरडून आपल्या मालकांना सावध तर केलं पण स्वतः मात्र अडकला.
राव, हे ड्रग डीलर्स किती पोचलेले आहेत हे पुढे समजलं. पोपटाला पोलीस स्टेशन मध्ये आणल्यापासून त्याने तोंडातून अवाक्षरही काढलं नाही. एका वफादार नोकरासारखा तो गप्प राहिला. पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गातून त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला एका प्राणीसंग्रहालयाकडे सोपवण्यात आलं आहे. पिंजऱ्यात राहिल्याने त्याला उडता येत नाहीय, महिनाभर त्याला उडायला शिकावल्यानंतर त्याला सोडून देण्यात येईल.
मंडळी, ब्राझीलचे ड्रग डीलर्स हे आता प्राण्यांना पण आपल्यात सामील करून घेत आहेत. काहीजणांकडे पोलिसांना मगरी आढळून आल्या. असं म्हणतात की हे ड्रग डीलर्स आपल्या शत्रूंना मगरींना खाऊ घालतात.