computer

या माणसाच्या मेंदूतून प्रकाशाच्या वेगाने चक्क प्रोटॉन्स गेले आणि तरीही तो जिवंत आहे!!

मेंदू आणि त्यासंबंधीचे इतिहासातले २ अजब किस्से आम्ही तुम्हाला सांगितले होते. आज आम्ही तिसरा किस्सा घेऊन आलो आहोत. हा किस्सा आहे एका अशा शास्त्रज्ञाचा ज्याच्या सोबत इतिहासातला दुर्मिळ पण तितकाच घातक अपघात घडला, पण चमत्कार म्हणजे तो आजही जिवंत आहे.

दुर्मिळाताली दुर्मिळ केस आहे ही भौ !!

मंडळी, पार्टिकल एक्सलरेटर या एका प्रचंड मोठ्या मशीन मधून कण (particles) प्रकाशाच्या वेगाने फिरवले जातात. या पद्धतीने मूलकण भौतिकशास्त्राचा (particle physics) अभ्यास केला जातो. या मशीनमुळे आजतागायत अनेक शोध लागलेले आहेत. आपला आजचा किस्सा याच मशीनच्या संदर्भात आहे.

‘अॅनाटोली बुगोरस्की’ हे रशियन शास्त्रज्ञ रशियन पार्टिकल एक्सलरेटरवर काम करत होते. या पार्टिकल एक्सलरेटरचं नाव होतं Synchrotron U-70. जुलै १३, १९७८ रोजी अॅनाटोली यांना Synchrotron च्या आत बिघाड आहे असा संशय आला आणि त्यांनी तपासण्यासाठी आपलं डोकं मशिनच्या आत घातलं. Synchrotron मशीन त्यावेळी बंद होती. ज्या भागात त्यांनी डोकं घातलं होतं तिथूनच इलेक्ट्रॉन्सची गती वाढवली जायची. अॅनाटोली यांनी तपासासाठी आत डोकं टाकल्यानंतर त्याचवेळी सुरक्षाव्यवस्था बंद पडली आणि मशीन चालू झाली.

धमाका !!!

एक धमाका झाला !! प्रोटॉनचा एक झोत अॅनाटोली यांच्या डोक्यामधून गेला आणि नाकामधून बाहेर पडला. हा झोत इतका जबरदस्त होता की १०० सूर्य डोळ्यासमोर चमकावे तसं अॅनाटोलींना वाटून गेलं. विश्वास बसणार नाही, पण या संपूर्ण अपघातात त्यांना त्रास जाणवला नाही.

त्यांना लगेचच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार आणि संशोधन एकाचवेळी सुरु झाले. इतिहासातली ही पहिलीच अशी घटना होती. अॅनाटोली यांनी विज्ञानाला एक नवीन उदाहरण देऊन हे दाखवून दिलं होतं की या प्रकारच्या अपघातात माणसाचं काय होऊ शकतं.

आधीच सांगितल्याप्रमाणे अॅनाटोली यांना दुखणं असं जाणवलंच नाही, पण काहीकाळातच त्यांच्या चेहऱ्याचा डावा भाग सुजला. त्यावेळी त्याची परिस्थिती बघून कोणीही म्हटलं असतं की हा माणूस काही दिवसातच मरण पावेल, पण ते वाचले.

प्रोटॉनचा जो झोत त्यांच्या मेंदू आणि डोळ्यातून गेला होता त्याने मेंदूत किरणोत्सर्जन शोषलं गेलं होतं. किरणोत्सर्जन मोजण्यासाठी “ग्रे” हे एकक वापरलं जातं. अॅनाटोली यांच्या मेंदूत झोत शिरला त्यावेळचे किरणोत्सर्जन हे तब्बल २००० ग्रे एवढे होते तर बाहेर निघताना ३००० ग्रे एवढे होते.

५ ग्रे पेक्षा जास्त किरणोत्सर्जन जर शोषलं गेलं तर माणसाचा १४ दिवसातच मृत्यू होतो. अॅनाटोली यांच्या बाबतीत या प्रमाणाने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते.

अॅनाटोली या अपघातातून सहीसलामत वाचले, पण त्यांना आजही त्याचा त्रास होतो. ज्या भागातून प्रोटॉनचा झोत गेला होता त्या भागातल्या मेंदूच्या पेशी जळाल्या. कवटीच्या वरच्या भागातली त्वचा लवकरच उखडू लागली. नंतर त्यांच्या डाव्या कानाची ऐकण्याची शक्तीच निघून गेली. सध्या त्यांना tinnitus चा त्रास होतो. Tinnitus म्हणजे कानात सतत विशिष्ट आवाज येत राहतो. हेही कमीच की काय म्हणून त्यांच्या चेहऱ्याचा डावा भाग लुळा पडला आहे.

मंडळी, अॅनाटोली यांनी अपघातानंतर आपली डॉक्टरेट मिळवली. ते रशियाच्या किरणोत्सर्गी औषधांचे ‘पोस्टर बॉय’ बनले. त्यावेळी रशियाने आपली अणुउर्जा सगळ्या जगापासून लपवून ठेवली होती, याच कारणाने अॅनाटोली यांनी बराचकाळ या विषयावर बोलणं टाळलं. पुढे त्यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञांना स्वतःवर संशोधन करायची परवानगी दिली, पण त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते कधी आपल्या शहरातून बाहेर पडू शकले नाहीत. सध्या ते ७७ वर्षांचे आहेत आणि अगदी ठणठणीत आहेत.

 

तर मंडळी, कसा वाटला हा आजचा किस्सा. पूर्वीचे दोन किस्से वाचण्यासाठी खालील लिंकवर नक्की जा !!

आपला मेंदू काय काम करतो याचा शोध या विचित्र अपघातामुळं लागला..

या व्यक्तीला तब्बल ४० वर्ष झोप लागली नाही...वाचा विज्ञानाला चक्रावून सोडणारा किस्सा !

सबस्क्राईब करा

* indicates required