computer

युपीचे लोक स्वतःहून तुरुंगात का जात आहेत ?? हा कोणता नवीन ट्रेंड आहे भौ ??

(प्रातिनिधिक फोटो)

जुने-जाणते म्हातारे सांगून गेले आहेत. त्यामुळे कोर्टाची आणि कचेरीची पायरी शहाणा माणूस चढत नाही. हे किती खरे आहे ते ज्याला अनुभव आहे त्यालाच विचारा मंडळी!! जर फक्त काही तासांसाठी कुणाला जेलमध्ये रहावे लागले, तर तो डाग आयुष्यभर पिच्छा पुरवतो. म्हणुन कुणालाच जेलमध्ये जाणे चांगले वाटत नाही. पण काही महारथींसाठी जेल म्हणजे दुसरे घर असते. पण त्यांची गोष्ट वेगळी. सर्वसामान्य माणूस या सगळ्या गोष्टींना घाबरूनच असतो. पण युपीवाल्यांची बातच न्यारी असते राव!! तिथे लोकं स्वतःहून अटक करवून घेत आहेत. तिकडे हा ट्रेंडच सुरु झाला आहे.

युपीवाले भैय्या पळत पळत जेलमध्ये जाऊन त्यांना आतमध्ये घेण्याची विनंती करत आहेत. पण भारतातले पोलीस म्हणजे किती कर्तव्यदक्ष नाही का? ते सांगतात,  "तुमचा काहीही गुन्हा नाही. तुम्हाला आम्ही अटक करू शकत नाही". तर तिथले भैय्या लोक्स रीतसर प्रशासनाला पत्र लिहून अटक करण्याची विनंती करत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे पोलीस पण त्यांची ही विनंती मान्य करत आहेत. तुम्ही म्हणाल असे काय पहाड कोसळले राव त्यांच्यावर? बाहेर सुरक्षितच वाटत नाही का त्यांना? पण मंडळी मॅटर थोडं वेगळं आहे. 

भारतात ज्योतिष्याला कुंडली दाखवून भविष्य बघण्याची लोकांना लय हौस. अशापायी लोक स्वतःचे खुप नुकसान पण करून घेतात. आता युपीत पण तसेच झाले आहे राव!! ज्योतिषीबुवा कुंडली बघून लोकांना सांगत आहेत की तुमच्या कुंडलीत जेलयोग आहे. मग मोठ्या लफडयात अडकून खूप वर्ष जेलवारी करण्यापेक्षा दोन तीन दिवस जेल फिरून आलो, तर जेलयोग तरी टळेल हे त्या बिचाऱ्या लोकांचे साधे सरळ लॉजिक आहे राव!! आणि याच कारणामुळे लोकं जेलमध्ये भरती होत आहेत. 

पोलीस प्रशासन पण त्यांना या कामात सहकार्य करते. म्हणजे जर एखादा "मला जेलमध्ये घ्या" म्हणून सांगायला लागला तर रीतसर त्याची कुंडली चेक करून त्याच्या कुंडलीत खरंच जेलयोग आहे का ते बघितले जाते. एवढी तत्परता दुसऱ्या ठिकाणी दाखवली असती तर यूपीचा क्राईम रेट इतका जास्त राहिला नसता राव!! असो...

मंडळी आणि हे फक्त आता होत आहे अशातला भाग नाही. अशा गोष्टी तिथे नेहमी घडत असतात. कोण कधी कुंडली घेऊन येईल आणि जेलमध्ये घ्यायला सांगेल काही नेम नाही राव!! जेव्हा ज्योतिषी एखादे संकट येणार असे सांगतो तेव्हा त्यावर उपाय पण ज्योतिषी बुवाकडे तयारच असतो. आपल्याकडे नाही का मुलीच्या कुंडलीत दोष राहिला की ही पूजा करा, ती पूजा करा म्हणजे दोष गायब सांगणारे बुवा बाबा गलीगल्लीत भेटतात, तसाच हा प्रकार. तर त्यांना पण तिथले ज्योतिषी जेलयोगापासून वाचण्यासाठी दोन तीन दिवस जेलवारी करून येण्याचा सल्ला देतात. आणि बिचारे भोळे भाबडे लोक ते करतात सुद्धा. आता याला अंधश्रद्धा म्हणावे किंवा काय, हे ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे राव!! पण २१ व्या शतकातला भारत मंगळावर जाऊन आला, पण अजूनही त्याच्या कुंडलीतील मंगळ काय त्याचा पिच्छा सोडत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required