computer

धगधगता ज्वालामुखीचे हे भन्नाट फोटो पाहिले असतील तर आता त्या मागची गोष्ट पण वाचून घ्या!!

ज्वालामुखीचे अनेक फोटो आपण पाहिले असतील. ते फोटो काढणं सोपी गोष्ट नाही. ज्वालामुखी जवळचे वातावरण अत्यंत उष्ण असते. तिथे जवळपास कोणी फिरकूही शकत नाही आणि जेव्हा याचा उद्रेक होतो त्यावेळी तर तिथले वातावरण कसे असेल याची कल्पनाच न केलेली बरी! पण एका साहसी फोटोग्राफरने या धगधगत्या ज्वालामुखीचे एका विशिष्ट नैसर्गिक प्रकाशात असे काही अद्भुत फोटो घेतले आहेत की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. कोण आहे हा फोटोग्राफर आणि त्याचा हा संपूर्ण अनुभव कसा होता, याविषयी माहिती करून घेऊयात.

फोटोग्राफर ख्रिस मॅथ्यूजने जिवंत ज्वालामुखीचे फोटो घेतले आहेत. इतके जवळून घेतलेले हे फोटो खरोखर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. आणि या फोटोंचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे northen lights मध्ये घेण्यात आले आहेत. Northen lights म्हणजे ध्रुवीय देशांत रात्री दिसणारे नैसर्गिक लाइट्स. हा एक रंगांचा सोहळाच असतो, जो या कालावधीत रात्री अनुभवता येतो. हिरव्या, केशरी, पिवळ्या अशा अनेक रंगांनी आकाश भरून जाते. हे लाईट्स वर्षभर दिसत नाहीत, तर ते ठराविक काळातच दिसतात. यासाठी अनेक पर्यटक या कालावधीत ध्रुवीय देशांना भेट देत असतात. मॅथ्यूजने या लाइट्समध्ये घेतलेले फोटो म्हणजे कोणत्याही फोटोग्राफरसाठी once in lifetime असा अनुभव होता. या फोटोंमध्ये ज्वालामुखीचे अंतरंग इतके अचूक टिपले गेले आहेत की पाहून आश्चर्य वाटते. आणि विशेष म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेक होताना हे फोटो घेतलेले आहेत. तसेच हे फोटो कोणत्याही ड्रोनने न टिपता कॅमेऱ्याने टिपले आहेत. मॅथ्यूजने त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

आइसलँडमध्ये ज्वालामुखीचे उद्रेक अनेकवेळा होतात. ५ रिष्टरपेक्षा मोठ्या तीव्रतेचे भूकंप होत असल्याने ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. मॅथ्यूजने आइसलँडमधील गेल्डिंगडालूर ज्वालामुखीच्या उद्रेकाचे सर्व रंग अगदी खुबीने फोटोत कैद केले आहे. मॅथ्यूजने १९ मार्च २१ ला संध्याकाळी ग्रिंडावॅक शहराच्या जवळ हा ज्वालामुखीचा विस्फोट झाला. मॅथ्यूजने २० मार्चच्या पहाटे,अचूक वेळ साधत हे फोटो घेतले. फोटोमध्ये वाहत्या लाव्हाची चमक ज्वालामुखीच्या वरील ढगांमध्येही दिसून येते. हा अनुभव खूप रोमांचक होता असे मॅथ्यूज सांगतो.

२४ फेब्रुवारीला ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा मॅथ्यूजला कल्पना आली होती की ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. त्याने वाट पाहिली. तो शहरापासून थोड्याच अंतरावर एका ठिकाणी राहिला. ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे माहीत होते पण तो केव्हा आणि कुठे होईल याची कल्पना नव्हती. कारण ३ आठवड्यात त्या भागात ४०,००० हून जास्त भूकंप झाले होते. त्यामुळे उद्रेकाची नक्की जागा शोधणे अवघड झाले होते.

१ मार्चला मॅथ्यूजला फोन आला की एक स्फोट सुरू आहे. मॅथ्यूज लगेच निघाला त्याने तिथे बर्‍याच ठिकाणी भेट दिली पण हवामान खराब होते, त्यामुळे काही दिसत नव्हते. नंतर जेव्हा तो ग्रिंडावॅक शहराजवळ गेला तिथे एक वेगळा केशरी रंगाचा प्रकाश दिसत होता. आकाश साफ होते. मग पहाटेच तो निघाला, ज्वालामुखीच्या जवळ जाता येईल का हे त्याने पाहिले. तिथे खूप जोरदार वारा होता. आईसलँडमध्ये वातावरण खूप पटकन बदलते. स्वच्छ सूर्यप्रकाश जाऊन कधी हिमवादळ सुरू होईल याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे फोटो घेताना लेन्सची निवड करणे आव्हानात्मक असते. मॅथ्यूजने कॅनन 90 डी बॉडी कॅमेऱ्यात दोन वेगळ्या लेन्स वापरून हे फोटो घेतले आहेत. तसेच हेलिकॉप्टरमधून फोटो घेणे अवघड होते कारण कॅमेरा सेट करण्यासाठी जागा कमी असते, ट्रायपॉडवर कॅमेरा सेट करावा लागतो. म्हणून मॅथ्यूजने सर्व हवाई फोटो ईगल एअरच्या cessna या स्थानिक विमानातून घेतले आहेत. मॅथ्यूज म्हणाला की या विमानातून कॅनन ७९-२०० मिमी f / २.८L झूम वापरून ज्वालामुखीचे फोटो काढण्यासाठी त्याला खूप वेळ मिळाला. फोटो घेताना मध्येच थांबावे लागले कारण अचानक एक हिमवादळ आले. त्यामुळे पुढे अजून फोटो काढता येतील की नाही याबद्दल मॅथ्यूज साशंक होता. पण त्याच्या नशिबाने ते हिमवादळ थांबले आणि रात्रीही फोटो काढता आले. त्या दिवशी त्याचा वाढदिवसही होता त्यामुळे असे फोटो मिळणे ही एक स्वतःसाठी भेट होती असे मॅथ्यूज मानतो.

आईसलँड हे फोटोग्राफीसाठी स्वर्गच मानले जाते. इथले ज्वालामुखी, हिमनदी, धबधबे, गिझर, हॉट स्प्रिंग्ज आणि वन्यजीव यांचे खूप सुंदर फोटो काढता येतात. पण त्यासाठी चिकाटी आणि संयम लागतो. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत इथे वातावरण पाहण्यासारखे असते. याच कालावधीत northen lights चा अनुभवही घेता येतो. मॅथ्यूज त्याने काढलेले सर्व फोटो वेबसाईटवर शेअर करतो. हे त्याने काढलेले नेत्रदीपक फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. जगभरात ते पहिले जात आहेत. त्यामळे मॅथ्यूज खुश आहे. कोणत्याही फोटोग्राफरसाठी हे खरंच खूप प्रोत्साहन देणारे आहे. ज्वालामुखीचे असे फोटो काढणे हे खरंच धाडसाचे काम आहे. हो ना?

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा:

बापरे, हिच्यासमोर ज्वालामुखीही थंडावला?

सबस्क्राईब करा

* indicates required