चक्क पोलिसांनी बुजवला रस्त्यावरचा खड्डा ? त्यांच्यावर हे काम करण्याची वेळ का आली ?
राव, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी म्हण प्रसिद्ध आहे. खड्ड्यांचा प्रश्न हा दरवर्षीचा आहे. पण काहीही झालं तरी आजचं धावतं जग काही थांबत नाही. मग आपल्यातलीच काही माणसं स्वतः पुढाकार घेऊन या समस्यांवर मार्ग शोधतात. काहीच दिवसापूर्वी आम्ही "दादाराव बिल्होरे" यांच्या बद्दल सांगितलं होतं. त्यांनी मुलाच्या मृत्यू नंतर मुंबईचे रस्ते खड्डे मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली. आज त्यांनी ५०० हून जास्त खड्डे बुजवले आहेत.
त्यांच्या सारख्या अनेक सामान्य लोकांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण आम्ही आज जी बातमी सांगणार आहोत ती थोडी वेगळी आहे. आजवर सामान्य नागरिक पुढे येत होते पण पुण्यात चक्क पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे.
प्रातिनिधिक फोटो (स्रोत)
त्याचं झालं असं, खेड-शिवापूर महामार्गावर पावसामुळे रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडला होता. या खड्डयामुळे जवळजवळ तासभर वाहतूक कोंडी झाली होती. या भागातून रोजची पुणे बंगलोर वाहतूक होत असल्याने गाड्यांची भली मोठी रांग लागली. हे बघून तिथल्या महामार्ग सुरक्षेसाठी गस्त घालणाऱ्या (highway safety patrol) पोलिसांनी स्वतःच खड्डा बुजवण्याचं ठरवलं. त्यांनी खड्डा बुजवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या प्रसंगातला व्हिडीओ तुम्ही लेखाच्या सुरुवातीला पाहू शकता.
यावर्षीचं असंच आणखी एक उदाहरण देता येईल. जुलै महिन्यात खारगरच्या ट्राफिक पोलिसांनी सायन-पनवेल महामार्गावरील खड्डा बुजवला होता. त्यावेळी तर चक्क २ किलोमीटर पर्यंत ट्राफिक जाम झाला होता.
रस्त्यावरचे खड्डे बुजवणं हे काही सामान्य नागरिक किंवा पोलिसांचं काम नव्हे. पण वेळ आलीच तर असेच सामान्य जन पुढाकार घेतात. अशा प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
आणखी वाचा :