computer

'आयुष्यभर स्मरणात राहतील असे १५ मिनिट'...तनय मांजरेकर ठरलाय हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय!!

हायपरलूपच्या बातम्या आजवर तुम्ही वाचल्याच असतील. हा असणार आहे तुम्हांआम्हाला करता येईल असा जगातला आजवरचा सर्वात वेगवान प्रवास. अगदी काही सेकंद-मिनिटांचा खेळ!! सगळं कसं झटपट व्हायला हवं. इथे थांबायला वेळ कुणाला आहे? अतिवेगवान किंवा अतिजलद प्रवास हा हेतू समोर ठेवून येऊ घातलेलं हे तंत्रज्ञान! ज्यांना वेगाची नशा आहे, ज्यांच्यासाठी प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे अशांसाठी तर हे वरदानच ठरणार आहे. ही टेक्नॉलॉजी भारतात यायला कदाचित अजून दहा पंधरा वर्षं जातील, पण एकदा ते आलं की भन्नाट काम होणार हे नक्की! साध्या मुंबई - पुणे प्रवासाचंच घ्या. हायपरलूपमुळे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत संपेल. एरवी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची मारुतीच्या शेपटासारखी सदैव लांबलेली रस्त्याची कामं, वाशीपुलावरचं ट्रॅफिक, पुढे घाटात कुठेतरी एका अडेलतट्टू ट्रकमुळे झालेली काशी, एकूणच लांबलेला प्रवास आणि त्यामुळे तमाम मोटारचालकांचं बिघडणारं मानसिक स्वास्थ्य हे सगळं इतिहासजमाच होईल. पण हे अनोखं तंत्रज्ञान आहे तरी काय?

मुळात हायपरलूप हे अतिजलद वाहतुकीसाठी विकसित केलेलं तंत्रज्ञान. त्यासाठी आपल्या ट्रेनसारखेच पण हवेचा कमीत कमी प्रतिरोध होईल अशा बेताने खास डिझाईन केलेले कॅप्सूलसारखे डबे असतात. त्याला म्हणायचं पॉड. हे पॉड चाकांवर न धावता चक्क हवेवर धावतात. हो, त्यासाठी हवेचा कमी दाब असलेला चॅनेल किंवा बोगदा तयार केला जातो. चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या रुळांवरून ही रेल्वे धावते. तिचा वेग बुलेट ट्रेनच्या दुप्पट असतो. या टेक्नॉलॉजीचा जनक म्हणजे ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’चा एलॉन मस्क. त्यानेच हायपरलूप या संकल्पनेची २०१३ मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली.

मात्र ही व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकं सोपं नाही. खुद्द यूएसमध्येच सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंद गतीने सुरू आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका टेस्ट राईडने याबाबतच्या आशांना पालवी फुटली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनच्या हायपरलूप टेस्ट पॉडच्या आत्तापर्यंत दोन टेस्ट राईड्स झाल्या आहेत. पहिल्या राईडसाठी व्हर्जिन हायपरलूपचे सहसंस्थापक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगेल आणि प्रवासी अनुभवविषयक संचालक सारा लुचिअन तर दुसऱ्या टेस्ट राईडसाठी मूळ पुणेकर असलेल्या तनय मांजरेकरची निवड झाली. त्यामुळे तनय हा ‘हायपरलूप’च्या चाचणी पॉडने प्रवास करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

यावेळी त्याची सहप्रवासी होती व्हर्जिनच्या आयटी विभागातील व्यवस्थापक अँनी ह्युन. या प्रवासासाठी त्यांनी अंतराळवीरांसारखा काही खास पोशाख वगैरे घातला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात नाही. त्यांनी साधे, नेहमीचेच कपडे घातले. फक्त सीटबेल्ट लावले. प्रवास सुरू झाल्यानंतर पॉडने चाचणीदरम्यान केवळ १५ सेकंदात ताशी १७० किलोमीटरचा वेग पकडला. एका क्षणात (इथे क्षण मोजण्यासाठी जिफी हे परिमाण वापरले गेले.) पॉडने ४०० मीटर अंतर कापले. विशेष म्हणजे पॉडमध्ये बसलेल्यांना बाहेरच्या वेगाचा जराही अंदाज येत नाही, पोटातलं पाणी हलत नाही इतका हा प्रवास 'स्मूथ' आहे. या चाचणी पॉड मध्ये केवळ दोघांच्याच बसण्याची सोय होती. व्यावसायिक पॉडमध्ये मात्र २८ प्रवासी बसू शकतात.

तनय मांजरेकरने पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर त्याने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१६पासून तो व्हर्जिन हायपरलूपमध्ये काम करतो आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाच्या कन्स्ट्रक्शन फेजमध्ये इलेक्ट्रिकल हार्डवेअरच्या जुळण्या आणि एकंदर प्रकल्पाची 'इलेक्ट्रिकल साईड' सांभाळणं हे त्याचं काम. विशेष गोष्ट ही की याआधी त्याने पॉडचा लाईव्ह व्हिडीओ कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे आपलं होमवर्क किती व्यवस्थित झालंय हे पाहण्यासाठी ही टेस्ट राइड निर्णायक होती. आज मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपली कामगिरी उत्तम झाल्याचं समाधान दिसतं.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required