computer

जिओचॅट आणि जिओमिट : स्वदेशी ॲप्सच्या नावाखाली परदेशी ॲप्सची कॉपी?

जिओ सावन, जिओ सिनेमा, जिओ ब्राऊझर, जिओ‌ कॉल, जिओ सिक्युरिटी... जिओची ढिगभर ॲप्स आधीच प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण‌ देशात आज हवा आहे ती 'मेड इन इंडिया'ची. सरकारनं चायनीज ॲप्सवर घातलेली बंदी आणि लोकांचा स्वदेशी‌ गोष्टींकडे वाढणारा कल पाहाता 'जिओ'नं या परिस्थितीचाही व्यावसायिक फायदा घ्यायचं ठरवलेलं दिसतंय.

काही दिवसांआधीच आपण जिओनं लॉन्च केलेल्या 'जिओमिट' या स्वदेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपबद्दल वाचलं होतं. पण लॉन्च होताच या ॲपवर टिकेची झोड उठलीये ती या ॲपच्या डिझाईनमुळं. कारण ज्या Zoom ॲपला टक्कर द्यायला हे ॲप आलं होतं, त्याचीच नक्कल 'जिओमिट'मध्ये झालेली दिसतीय! फिचर्सच्या बाबतीत नकळत उजवं असलं तरी जिओमिटचा इंटरफेस हा पूर्णपणे Zoom ॲपशी मिळताजुळता आहे.

दुसरीकडे जिओचंच आणखी एक ॲप जिओचॅट पाहा. हे ॲपही डिट्टो व्हाट्सॲपची कॉपी दिसून येतं. दोन्ही ॲप्समध्ये अगदी रंग बदलण्याची तसदीही जिओनं घेतली नाहीये. जुनी ॲप्स सोडून ही ॲप्स वापरावीत अशी कोणतीही खास बाब इथे दिसून येत नाही. 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन'च्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही माहिती जिओनं दिली नसल्यामुळं आपली माहिती किती सुरक्षित आहे हा प्रश्नही येतोच. या सगळ्यामुळं सोशल मिडियावर या दोन्ही ॲप्सची, ॲप डिझायनिंग टीमची आणि थेट अंबानींचीही खिल्ली उडवली जात आहे.

परदेशी ॲप्सना स्वदेशी पर्याय उभं करणं ही आपल्यासाठी नक्कीच चांगली बाब आहे. पण हे करायच्या नादात आजपर्यंत चायनीज कंपन्या जे करत आल्या तेच इथंही होऊ नये म्हणजे मिळवलं. बरोबर ना?

सबस्क्राईब करा

* indicates required