पाहा व्हिडिओ: असंख्य सापांच्या विळख्यातून कशी सुटली ही समुद्री पाल..

नॅशनल जिओग्राफिकवरचे व्हिडिओज आपण एकदा पाहायला लागलो की त्यातच गुंगून जातो. हल्ल्याच्या तयारीतले प्राणी आणि त्यांचे सावज यांच्यातला खेळ पाहण्यासारखा असतो. पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि कितीतरी पटीने ताकदवान किंवा संख्येने जास्त असलेल्या शिकार्‍यांना गुंगारा देऊन त्यांचं भक्ष पळून जातं. सिंहांच्या कळपावर उलटून हल्ला करणार्‍या म्हशींच्या कळपाचा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेलच.

 बीबीसीच्या प्लॅनेट अर्थ या मालिकेतला हा पहिला व्हिडिओ काल प्रसारित झाला. तेव्हापासून वेगवेगळ्या सोशल साईट्सवरती तो फिरतोय. लोकांना तो फक्त आवडलाच नाहीय तर त्यावर लोक हिरीरीने चर्चाही करताना दिसत आहेत. या व्हिडिओत एका टेकडीच्या पायथ्याशी खूप सारे साप जमलेयत. एकेकाची लांबी पाहाल तर धडकीच भरेल. त्यात इतके सारे साप एकाच वेळी पाहिले तर पाहणारा भीतीनेच मरून जाईल.  तिथंच जमिनीवर आहे एक सरपटणारा प्राणी- समुद्री पाल! आपल्या पालीसारखी पण तिच्याहून कितीतरी पट मोठी. साप जमिनीवरची स्पंदनं ऐकायचा प्रयत्न करत त्या महाकाय पालीचं ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एक जीवाला मुकते पण दुसरी थोडी धीट आणि हुशार वाटते. ती शांतपणे कानोसा घेतेय. तेवढ्यात एक साप तिला मागून स्पर्श करतो आणि ही बया तीनताड उडते. ती पळत सुटते आणि असंख्य साप तिचा पाठलाग करायला लागतात.  या पालीचं सुरक्षित ठिकाण आहे टेकडीच्या टोकावर. त्यामुळे तिला टेकडीच्या बाजूनं पळावं लागतं आणि तिथे तर सापांचा घोळकाच असतो. तिला ते घेरतात, विळखा घालतात. आता संपली ही.. असं वाटत असतानाच ती त्या विळख्यातूनही सुटते आणि टेकडी चढायला लागते. वर चढत असतानाही एक मोठा साप ’आ’ करून तिचे पाय किंवा शेपटी पकडायचा निकरानं प्रयत्न करताना दिसतो. इथं  ’काय होईल’ म्हणत आपलेही श्वास पुन्हा एकदा अडकतात आणि सगळ्यांना गुंगारा देऊन पालबाई टेकडीच्या टोकावर दुसर्‍या पालबाई किंवा पालबाबा(जे काही असेल ते)त्याच्या शेजारी जाऊन बसतात.

अवघ्या चार मिनिटांचा हा व्हिडिओ, पण अंगावर सर्रकन काटा आणतो. जीवावर एकदा नाही, अनेकदा बेतलेले असतानाही ही पाल शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडत नाही हे अगदी पाहण्यासारखं आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required