computer

या विचित्र दिसणाऱ्या शिल्पांमागे दडलाय मोठा इतिहास !!

इतिहासाची आठवण म्हणून शिल्पं उभारली जातात. भारतात महापुरुषांची शिल्पं उभारायची पद्धत आहे. जगभरातलं चित्र थोडं वेगळं आहे. इतिहासातल्या एखाद्या लहानशा पण महत्वाच्या घटनेवर देखील शिल्प उभारलेली दिसतात. जगभरात अशी अनेक शिल्पं पाहायला मिळतात. या शिल्पांचा आपल्याला अर्थ समजत नाही, पण त्यांचा इतिहास जाणून घेतल्यावर त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलते.

आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी अशा मोजक्या शिल्पांचा इतिहास घेऊन आलो आहोत.

१. बॅग हवेत उडवणारी बाई.

स्वीडनच्या वेक्स्यो येथील हे शिल्प आहे. या शिल्पाला बघितल्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की या बाई हवेत बॅग का उडवत आहेत ? त्याचं एवढं काय कैतुक की कलाकाराने शिल्प तयार केलं ? खरं तर हे एका महत्वाच्या घटनेवर आधारित आहे.

या बाईंच नाव आहे ‘डॅनॉट डॅनियलसन’. १९८५ साली स्वीडनच्या रस्त्यांवर नॉर्डिक राईश पक्षाचं शक्तीप्रदर्शन सुरु होतं. हा पक्ष हिटलरच्या नात्झी विचारसरणीला मानणारा होता. लोकांमध्ये या पक्षाविषयी राग तर होता पण कोणी त्यांच्या वाट्याला जात नव्हतं. डॅनॉट बाई हिम्मत करून या शक्तीप्रदर्शनाच्या ठिकाणी गेल्या. फक्त तिथे गेल्याच नाही तर त्यांनी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला आपल्या हातातल्या बॅगने मारलं देखील.

त्यांच्या हिमतीने इतरांना देखील उर्जा मिळाली आणि लोकांनी नॉर्डिक राईश पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाकलून लावलं. लोकांच्या रागाचा एवढा परिणाम झाला की पक्षातील लोकांना रेल्वेच्या बाथरूममध्ये लापावं लागलं.

डॅनॉट डॅनियलसन यांनी दोन वर्षांनी आत्महत्या केली. त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीचा हा परिणाम होता. त्यांनी आपल्या बॅगने कार्यकर्त्याला मारलं तो क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला होता आणि तो जगभर फिरत होता. एवढंच नाही तर त्यांच्या बॅग सारख्या दिसणाऱ्या बॅग्सना बाजारात मागणी वाढली.

त्यांनी दाखवेलेल्या हिमतीमागे त्यांच्यातील ज्यू रक्त कारणीभूत होतं. त्यांची आई ज्यू होती. त्यांचा नाझींनी छळछावणीत जीव घेतला होता.

२. छतावर अडकलेला शार्क.

इंग्लंडच्या ऑक्सफर्ड भागातील हे शिल्प आहे. आभाळातून आलेला शार्क छतातून घरात शिरत आहे असं हे शल्प आहे. बघणाऱ्याला हे विचित्र आणि विनोदी वाटू शकतं. या शिल्पाचा अर्थ मात्र फारच वेगळा आहे. तो शार्क अणु बॉम्बचं प्रतिक आहे. नागासकीवर पडलेल्या अणु बॉम्बची आठवण म्हणून या घटनेच्या ४१ व्या वर्धापनदिनी या शिल्पाची स्थापना करण्यात आली.

३. कॅनडातील हत्तीचं भव्य शिल्प

हे एक साधं हत्तीचं शिल्प आहे. या मागे काय दडलं असेल ? मंडळी, काही महिन्यापूर्वी डिस्नेचा जम्बो सिनेमा येऊन गेला. या सिनेमातील हत्तीचं नाव ज्या खऱ्याखुऱ्या जम्बो हत्तीवरून आलं त्याचं हे शिल्प आहे. कॅनडाच्या सेंट थॉमस येथे हे शिल्प आहे.

जम्बो हा १८०० च्या काळातील सर्वात प्रसिद्ध हत्ती होता. सुदानच्या जंगलात त्याचा जन्म झाला. त्याच्या आईला शिकाऱ्यांनी मारून टाकलं. त्यानंतर त्याला पॅरीसच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आलं. पॅरीसहून त्याची रवानगी लंडनला झाली. तिथल्या प्राणीसंग्रहालयात तो चांगलाच प्रसिद्ध झाला. काही कारणांनी जेव्हा त्याला सर्कसला विकण्यात आलं तेव्हा लंडनच्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. १ लाख मुलांनी राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहून जम्बोला न विकण्याची विनवणी केली, पण शेवटी त्याला विकण्यात आलं.

त्याला विकत घेणाऱ्या “रिंगलिंग ब्रदर्स आणि बर्नम आणि बेली सर्कस” यांनी जम्बोच्या नावावर भरपूर पैसा कमावला. त्यांच्या सर्कसचं तो मुख्य आकर्षण होता. कॅनडातील एका शोच्या वेळी शो संपल्यानंतर जेव्हा जम्बो आणि इतर प्राण्यांना नेण्यात येत होतं तेव्हा अचानक आलेल्या ट्रेनने जम्बो ला धडक दिली. जम्बोचा जागच्या जगीच मृत्यू झाला. त्याच्या आठवणीत कॅनडात त्याचं शिल्प उभारण्यात आलंय.

जम्बोचा आणि भारताचा एक खास संबंध आहे. त्याकाळी लंडनच्या प्राणीसंग्रहालयाच्या देखरेखीची जबाबदारी भारताच्या ‘अनोशन अनाथजयश्री’ यांच्याकडे होती. जम्बोला त्याचं जम्बो हे नाव त्यांनीच दिलं.

४. रणगाड्याला जमिनीत गाडणारी कार

हे स्मारक क्रोएशियाच्या ओसजेक भागात आहे. लाल रंगाची फियाट कार त्याच्यापेक्षा अनेकपट वजनी आणि शक्तिशाली रणगाड्याला अक्षरशः जमिनीत गाडत आहे. हे स्मारक एका खऱ्या घटनेवर आधारित आहे.

२७ ज्युन १९९१ साली युगोस्लाव्हियन सैन्य ओसजेक भागात घुसलं होतं. एका नागरिकाने आपला विरोध दाखवण्यासाठी आपली लाल रंगाची फियाट सैन्याच्या रणगाड्यासमोर पार्क केली. त्यानंतर तो गाडीतून उतरला आणि बाजूला झाला. रणगाड्याने वाटेत आडव्या आलेल्या गाडीचा सहज चक्काचूर केला, पण त्या दिवशी संपूर्ण जगाला ओसजेकच्या नागरीकांचं मनोधैर्य दिसून आलं. या प्रसंगाचा व्हिडीओ त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता.

दुर्दैवाने शहरातील बरेचसे नागरिक या हल्ल्यात मारले गेले.

५. हातात कीटक धरलेली देवी

अमेरिकेच्या दक्षिण भागातील अलबामा येथे ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीत दिसत असलेली स्त्री खरं तर ग्रीक देवता आहे. ती धनधान्य, समृद्धी, शेती, सुपीकतेची देवी आहे. तिने दोन्ही हातात एक कीटक पकडलेला आहे आणि हात आभाळाच्या दिशेने आहेत. या मूर्तीमागे देखील एक वेगळी कथा आहे.

देवीच्या हातात जे कीटक आहे त्याला boll weevil म्हणतात. १९१५ साली या विशिष्ट कीटकांची संख्या प्रचंड वाढली होती. त्याकाळी या भागात मुखत्वे कापसाचं पिक यायचं. या कीटकामुळे कापसाच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं. सलग ३ वर्ष कीटकाने थैमान घातला होता. स्थानिक शेतकरी कंगाल होण्याच्या मार्गावर आले. यातून मार्ग कसा काढायचा याचा सगळे विचार करत असताना एका शेतकऱ्याने मात्र आपला मार्गच बदलला.

या शेतकऱ्याने कापसाच्या जागी भुईमुगाची शेती केली. योगायोगाने भुईमुगाला मागणी पण होती. त्याचं बघून इतर शेतकऱ्यांनी पण भुईमुगाच्या शेतीचा मार्ग निवडला. बघता बघता हवालदिल झालेला तिथला शेतकरी श्रीमंत झाला. त्या घटनेची आठवण म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं. जेव्हा सगळं संपलं आहे असं वाटतं तेव्हाच नवीन काही तरी सुरु करण्याची वेळ असते हे यातून सिद्ध होतं.

तर मंडळी, अशा शिल्पांमधून पुढच्या पिढीला नवीन उर्जा मिळत असते. ही पाचही शिल्प आपल्या आत मोठा इतिहास घेऊन उभी आहेत. पुढच्या भागात अशा आणखी कथा आम्ही घेऊन येऊ, तोवर ही पोस्ट नक्की शेअर करा.

 

आणखी वाचा :

५० वर्षं खपून एका मिल कामगारानं या जंगलात काय केलं हे पाहा..

आधुनिक शिल्पकलेचे १२ अप्रतिम नमुने!!

जाणून घ्या ग्रीक संस्कृतीत देवता आणि खेळाडूंचे पुतळे नग्नावस्थेत का असतात !!

स्पेनच्या फुटबॉल स्टेडीयमवर एका अंध व्यक्तीचा पुतळा का बसवण्यात आलाय ??

झाशीच्या राणीचा घोडा हवेत उधळलेला, तर शिवाजीमहाराजांच्या घोडयाचा पाय दुमडलेला का असतो?

व्हिडीओ ऑफ दि डे : या दोन पुतळ्यांच्या मागे आहे एक करुण प्रेमकहाणी !!

यश चोप्रांचा पुतळा स्विसमध्ये? स्वित्झर्लंडने केली एक ट्रेन आणि एक हॉटेल स्यूटही यश चोप्रांच्या नावावर..

सबस्क्राईब करा

* indicates required