'मला इथेच सोड, पण माझ्या बाळाला घेऊन जा'...एका आईवर हे म्हणण्याची वेळ का आली?

कॅलिफोर्नियाच्या जीवघेण्या आगीत अडकलेल्या एका आईने आपल्या बाळासाठी काढलेले उद्गार आज जगभर गाजत आहेत. तिने तिचा जीव वाचवणाऱ्या तरुणाला म्हटलं की ‘वेळ आलीच तर मला इथेच सोडून, माझ्या बाळाला घेऊन निघून जा’. मन हेलावून टाकणारे हे शब्द तुम्हाला नक्कीच सिनेमातील संवाद वाटतील. पण ही एक खरी घटना आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं आहे ते.
मागच्याच आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया भागातल्या तब्बल १,५०,००० एकर जागेत वणवा पेटला होता. आसपासच्या सगळ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढावा लागला. या आणीबाणीच्या प्रसंगी घडलेला हा किस्सा!!
तर झालं असं की, आग पसरू लागली तसं स्थानिक लोकांचं तिथून स्थलांतर करण्यात आलं. कॅलिफोर्नियाच्या एका हॉस्पिटलमधूनही सगळ्या रुग्णांना बाहेर काढण्यात आलं होतं. वाहनांची कमतरता असल्याने हॉस्पिटल स्टाफने रुग्णांच्या स्थलांतरासाठी स्वतःच्या कार्स वापरल्या. या रुग्णांमध्ये ‘रेचेल सँडर्स’ नावाची नामक एक महिला आपल्या बाळासोबत होती. तिची जबाबदारी ‘डेव्हिड’ या हॉस्पिटल स्टाफने स्वीकारली. तिचं सिझेरियनने बाळंतपण झालं असल्यानं तिला चालता येत नव्हतं. म्हणून रेचेलला आधी व्हीलचेअरवर बसवण्यात आलं आणि व्हीलचेअर कारमध्ये हलवण्यात आली.
त्या दरम्यान आगीने अक्राळविक्राळ रूप घेतलं होतं. आग इतकी भयानक झाली होती की कारही वितळू लागल्या होत्या. लोक वाहनं जागीच सोडून पायीच चालू लागले होते. रेचेलला जाणवलं की कदाचित आपल्यावरही पुढे हीच वेळ येईल. तिच्या मनात आपल्या बाळाविषयी विचार घोळत होते. तिने डेव्हिडला सांगितलं की ‘जर वेळ आलीच तर तू मला कारमध्येच सोडून बाळाला घेऊन निघून जा’. डेव्हिड तिच्याकडे पाहातच राहिला. त्याने जलद हालचाली करून कार रचेलच्या घराकडे वळवली. ते घरापर्यंत पोहोचले तोवर तिचं घर आगीत भस्मसात झालं होतं. सुदैवाने रेचेलच्या पती मुलांसोबत आधीच तिथून निघून गेला होता.
मंडळी, यानंतर डेव्हिड रचेलला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेला. सध्या बाळ आणि रेचेल दोघेही सुखरूप आहेत. मागचा पुढचा विचार न करता मदतीसाठी सरसावलेला डेव्हिड आणि आपल्या बाळासाठी जीव द्यायला तयार झालेली रेचेल या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बिरबलाच्या गोष्टीत माकडीण स्वत: बुडताना बाळाला पायाखाली घेते, पण प्रत्यक्ष आयुष्यात आई आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार होते. नाही का?
तर मंडळी, या प्रसंगाबद्दल वाचून तुम्हांला काय वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा लेख शेअर करायला विसरू नका !!