बोभाटा बाजार गप्पा : अमेरिकन शेअर बाजाराला हादरवणाऱ्या घटस्फोटाची गोष्ट !!

आपल्याकडे लग्न ठरल्यावर, साखरपुडा झाल्यावर, लग्न झाल्यावर, पेढे वाटून आनंद साजरा केला जातो. राजे महाराजे तर हत्तीवरून साखर वाटायचे म्हणे !! आता अमेरिकेत हत्ती नाहीत पण अशी हत्तीवरून साखर वाटावी अशी बातमी अमेरिकन शेअर बाजारात आहे. हो, ही गुड न्यूज लग्नाची नाही तर घटस्फोटाची आहे. घटस्फोट सुखरूप पार पडला म्हणून आनंद व्हावा असे आहे तरी काय ?
जगातल्या एक नंबरचा श्रीमंत माणसाच्या घटस्फोटाची म्हणजे अमेझॉनच्या “जेफ बेझोस”ची ही गोष्ट आहे. जेफ बेझॉसची आजच्या तारखेस १५,१०० कोटी डॉलर्सची मालमत्ता आहे. जगभरात १३ वेगवेगळ्या देशात अमेझॉन कार्यरत आहे.
आता ऍमेझॉन किंवा जेफ बेझॉस यांच्याबद्दल आणखी वेगळी माहिती आम्ही काय देणार, जे आहे ते सर्वच तुम्हाला माहित आहे, पण अमेरिकेच्या शेअरबाजारात त्यांचा घटस्फोट निर्विघ्न पार पडला ही आनंदाची बातमी म्हणून का साजरी केली जाते आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
२५ वर्षं सुखाने नांदल्यावर या जानेवारी महिन्यात या जोडप्याने काडीमोड घ्यावं असं ठरवलं. या दुराव्याचं कारण होतं जेफ बेझोस आणि ‘लौरेन सांचेझ’चं प्रेम प्रकरण ! ते उघडकीस आणण्यात मोठा हात होता सांचेझच्या भावाचा !!
इथपर्यंत शेअर बाजारचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नव्हता, पण Pre-nupचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा बाजाराला हुडहुडी भरली.
जगातल्या सर्वात श्रीमंत गृहस्थाचा घटस्फोट होण्यात बाजाराला काय रस असे तुम्ही विचारणारच ? याचं कारण असं आहे की लग्नापूर्वी या जोडप्यानी Pre-nup अग्रीमेंट केलं नव्हतं. Pre-nup म्हणजे लग्नापूर्वीच भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक बाबी संबंधीचा करार ! अमेरिकन कायद्यानुसार Pre-nup करार नसेल तर नवऱ्याची अर्धी संपत्ती बायकोला मिळते. म्हणजेच ऍमेझॉनमध्ये जे बेझोसच्या नावावर ७ कोटी ८८ लाख शेअर्स आहेत त्याची अर्धी मालकी बायको कडे जाणार.
साहजिकच अमेरिकन शेअर बाजार या बातमीने हादरला.
या नंतर बेझोसने त्याच्या शेअर्स पैकी काही हिस्साच, एकूण ४ टक्के पत्नीला द्यायचं ठरवलं आणि इथे शेअर बाजारवाल्यांच्या छातीत धडधडायला लागलं. नवऱ्याच्या या ऑफरला बायको धुडकावून लावेल आणि शेअरच्या भावात आणखी घसरण होईल या भीतीनं गुंतवणूकदारांची झोप उडाली. पण शेवटी बायको ती बायकोच ! तिनं ही ऑफर चक्क स्वीकारली आणि फक्त स्वीकारलीच नाही तर त्या शेअरचे व्होटींग राईट्स पण नवऱ्याला देऊन टाकले.
हे वाचून तुम्ही पण चक्रावलाच असाल नाही का ?

लग्नाची 25 वर्षं उलटल्यावर बेईमानी करणाऱ्या नवऱ्याला कायमचा धडा शिकवण्याची संधी सोडून देणाऱ्या बाईला काय म्हणावं ? तर मंडळी थोडा विचार कराल तर समजेल की या बायकी शहाणपणात भरभरून हुशारी होती.
बेझोसचे अर्धे शेअर घेऊन मॅकेंझी श्रीमंत झाली असती, पण बेझोस कमजोर पडला असता. तो कमकुवत झाला तर अमझोनची पत कमी झाली असती. म्हणजेच तिची संपत्ती कमी झाली असती.
आता व्होटींग राईट्स देऊन बाईंनी पैसे हातात ठेवले आणि जबाबदारी पुन्हा नवऱ्याच्या डोक्यावर टाकून मोकळी झाली. थोडक्यात घटस्फोटामुळे अमेझॉनच्या शेअर्सवरती होणारा दुष्परिणाम टळला आणि अमेरिकन शेअर बाजाराने सुस्कारा सोडला.
शेअर बाजारात घटस्फोट होतात तशी लग्न पण होतात. आपल्या पुराणात लग्नाचे गंधर्व विवाह, राक्षस विवाह, असे प्रकार सांगितले आहेत. बाजाराच्या भाषेत गंधर्व विवाह म्हणजे मर्जर्स आणि राक्षस विवाह म्हणजे टेकओवर. अशा वेगवेगळ्या कंपनींच्या विवाहाची श्टोरी आपण उद्या वाचूया.