f
computer

या ४ स्वस्तातल्या फोनवरही वापरता येते व्हाॅॅट्सॲप....

व्हाॅॅट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून जुन्या मित्रांसोबतच्या आठवणी जाग्या करता येतात. तसेच अनेक बिझनेसची कामेसुद्धा व्हाॅॅट्सॲप ग्रुप्समधून करणे सोपे झाले आहे. मंडळी, लोक आधी मोबाईल नंबर मागायचे, आता व्हाॅॅट्सॲप नंबर मागतात.  यावरून व्हाॅॅट्सॲपच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. मंडळी, अगदी कमी शिकलेली पब्लिकसुद्धा व्हाॅॅट्सॲप सहज वापरु शकते. तयार करणाऱ्यांनी त्याचे डिझाईनच तसं केलं आहे. कदाचित म्हणूनच व्हाॅॅट्सॲप एवढे लोकप्रिय आहे. फेसबुक, ट्विटरसारखी माध्यम व्हाट्सअपच्या मानाने कितीतरी किचकट आहेत.

आधी नुसते बेसिक मेसेजिंग देणाऱ्या व्हाॅॅट्सॲपमध्ये सतत नव्या फीचर्सची भर पडतेय आणि ते फीचर्स खूप उपयोगाचे आहेत हे ही लक्षात येतंय. म्हणूनच व्हाॅॅट्सॲप आज टॉपवर पोचले आहे. आता मंडळी, व्हाॅॅट्सॲप तर प्रत्येकाला वापरायचे आहे. पण प्रत्येक जण महाग मोबाईल घेऊ शकतातच असे नाही.  बरीच लोक असेही असतात ज्यांना व्हाॅॅट्सॲप तर वापरता येते, पण ऍण्ड्रॉइड फोन त्यांना तितका सहजपणे वापरता येत नाही. मग अशी जनता व्हाॅॅट्सॲप सारख्या मजेशीर साधनापासून दूर राहतात. आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलांनाही पालक फोन घेऊन देतात. ट्यूशन्स, शाळा, स्पोर्ट्स असं सगळं करताकरता मुलं दिवसभर घराबाहेर असतात. त्यांच्याकडेही फोन असावा वाटणं हे संपर्काच्या दृष्टीनं आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. पण मुलांकडून फोन हरवले जाऊ शकतात. त्यामुळं खूप महागही नको पण सगळे फीचर्स तर असावेत असा फोन त्यांच्यासाठी उपयोगाचा ठरेल.

 

तेव्हा मंडळी, आता फिकिर नॉट!! व्हाॅॅट्सॲप आता साध्या फोन्समध्ये पण चालतं. जनता मालिक असते मंडळी!! मंग कंपनीला तुमची काळजी घ्यावी लागेल ना? म्हणूनच कंपनीने आता साध्या फोन्समध्ये सुद्धा व्हाॅॅट्सॲप चालेल अशी सोय केली आहे. पण पण... व्हाट्सअप प्रत्येक साध्या फोनमध्ये चालेल असे होणार नाही मित्रांनो!! तर ते काही ठराविक फोन्समध्ये चालेल. तुम्ही म्हणाल कोणकोणते आहेत ते फोन्स? तेच तर सांगतोय मंडळी आम्ही!!

चला तर मग जाणून घेऊया कुठल्या कुठल्या मोबाईल्समध्ये तुम्ही व्हाॅॅट्सॲपचा आनंद घेऊ शकता...

जिओ फोन 4G

मंडळी जिओने तर भारतात डिजिटल क्रांती आणलीय. ज्यांच्यासाठी इंटरनेट म्हणजे स्वप्न होते, त्यांना अत्यंत कमी पैशांत इंटरनेट पुरवून भारतातल्या सर्वसामान्यांना इंटरनेटशी जोडले. पण मंडळी सगळेच काही स्मार्टफोन घेऊ शकत नाही.  मग त्यांना स्वस्त इंटरनेट देऊन काय फायदा? त्यावर पण जिओने उत्तर काढले. त्यांनी फक्त पंधराशे रूपयांमध्ये 4G फोन मार्केटमध्ये आणलाय. यात तुम्हाला व्हाॅॅट्सॲप तर चालवता येईलच पण फेसबुक, यू ट्यूबसारख्या ऍप्सची सुद्धा मजा घेता येईल. 2.4 इंचचा कलर डिस्प्ले असलेल्या या मोबाईलमध्ये तुम्हाला 512 mb रॅम मिळणार आहे.

2 mp कॅमेरा असलेल्या या मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा सुद्धा आहे.

जिओ फोन 2

हा फोन म्हणजे जिओ फोनचाच लहान भाऊ!! यातसुद्धा तुम्हाला व्हाॅॅट्सॲप वापरता येणार आहे. या फोनची किंमत आहे 3 हजार रुपये. मित्रांनो, जिओ फोनमध्ये जे फिचर्स आहेत, तेच फिचर्स यात पण असले तरी या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला डुअल सिम वापरता येईल. ती सोय जिओ फोनमध्ये नाही.

इंटेक्स टर्बो+ 4G

हा फोन जिओ फोनला टक्कर देण्यासाठी इंटेक्स कंपनीतर्फे मार्केटमध्ये आणण्यात आला आहे. साहजिक आहे, जे फिचर्स जिओ फोनमध्ये असतील तेच या फोनमध्ये पण असतील. पण या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात डुअल कोर प्रोसेसर वापरण्यात आले आहे. 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 mb रॅम यातसुद्धा देण्यात आले आहे. 2 mp रियर आणि VGA फ्रंट कॅमेरा अशी कॅमेराची रचना आहे. 2000 mAh बॅटरी असलेल्या या मोबाईलची किंमत 2000 ठेवण्यात आली आहे.

नोकिया 8110 बनाना फोन

नोकिया बनाना फोन काही महिन्यांपूर्वी मार्केटमध्ये आणण्यात आला. आणि नुकतीच त्यात व्हाॅॅट्सॲपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण मंडळी, याची किंमत स्मार्टफोनच्या जवळ जाणारी आहे. हा फोन तुम्हाला 5 हजार रूपयांमध्ये पडेल. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याची बनाना स्लाइडर रचना!! 2.45 इंच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 4 gb मेमरी देण्यात आली आहे. तर 512 mb रॅम आहे. यात ड्युयल सिमची सोय असली तरी यात फ्रंट कॅमेरा नाही. सेल्फीची हौस असलेल्यांना हा फोन कामात येणार नाही.

हे होते काही अगदी कमी किमतीतील फोन ज्यांच्यात तुम्ही व्हाॅॅट्सॲप वापरु शकता. तुम्ही स्वत: जरी महाग फोन वापरु शकत असलात तरी तुमच्या ओळखीच्या लोकांसाठी ही माहिती खूप मोलाची असेल.

त्यांच्यासोबत आमचा हा लेख नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required