४० दिवसांनंतर प्यायलेला वीरू, त्याची बसंती आणि पाण्याची टाकी... तुम्हांला काय वाटतं, पुढे काय झालं असेल??

काल दिवसभर पिणारे आणि न पिणारे असे सगळेच दारुवर बोलत होते. दारू चढल्यावर पण बेवडे काय बरळतील इतकी काही बरळ दिवसभर चालू होती. याच दरम्यान अलिगढ -उत्तरप्रदेशमध्ये एका बेवड्याने चक्क पाण्याच्या टाकीवर उभं राहून 'लाइव्ह शो' सुरु केला. चाळीस दिवसांनी दारू प्यायल्यावर  त्याच्या अंगात शोले सिनेमातला वीरू संचारला. एकदा अंगात वीरू संचारल्यावर 'मौसी' काय म्हणतेय हे न ऐकता तो थेट पोहचला पाण्याच्या टाकीवर! एकदम फुल्ल टल्ली!

आता ही सनसनाटी बातमी अलिगढमध्ये काही वेळातच व्हायरल काय वेळ लागणारे का? टाईमपास करायला आयतीच संधी मिळाल्यावर पब्लिक गोळा झालं. पोलीस आले. या हिरोची नौटंकी इतकी जबरी होती की पोलीस फारशी आक्रमक भूमिका घेत नव्हते. कदाचित त्याने खरंच उडी मारली तर या विचाराने त्यांनी मेगाफोन वापरून या बेवड्यासोबत बोलणी सुरु केली. थोड्याच वेळात अलीगढच्या मेयर बाई पण पोहचल्या. त्यांनी पण विनंत्या केल्या पण हा हिरो काही ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता. 

त्याने एकच ठेका धरला होता " सुसाईट , सुसाईट". 

पोलीस आले, गाववाले आले, मौसी पण आली. आता फक्त बसंती यायची बाकी होती. पण या इसमाच्या 'बसंती'ला म्हणजे त्याच्या पत्नीला या हिरोच्या नौटंकीची सवय असावी. तिने त्याला सांगितलं लवकर खाली ये, नाहीतर मीच 'सुसाईट' करते.

शेवटी काही वेळाने  वीरूची नशा कंमी झाल्यावर हिरोपंती संपवून हा बेवडा खाली उतरला. पोलीसांनी प्रकरण न वाढवता त्याला घरी जाऊ दिले आणि नाटक संपले. पण या गोंधळात सोशल डिस्टन्सींगची ऐसी की तैसी झाली हे वेगळं सांगायलाच नको . 

तर मंडळी काल तुमच्या गावात असं काही झालं असेल सांगा कमेंटमध्ये!

सबस्क्राईब करा

* indicates required