तब्बल ५२,८४१ रुपयांचं दारूचं एक बिल? या व्हायरल फोटोमागचं सत्य वाचा !!

काल तिन्ही झोन मधली दारूची दुकाने काही नियम आणि अटी राखून उघडण्यात आली. एवढे दिवस दारूचा थेंब न मिळालेल्या मंडळींसाठी ही पर्वणीच होती. भल्या मोठ्या रांगा लावून लोकांनी खरेदी केली. एकट्या कर्नाटकात ४५ कोटींची मद्यविक्री झाली आहे भाऊ. ४५ कोटीत सर्वात मोठा हातभार असलेलं एक बिल सध्या व्हायरल होत आहे. या बिलमध्ये चक्क ५२,८४१ रुपये एवढ्या रकमेची दारू घेतल्याचा उल्लेख आहे.
हे बिल तुम्ही सुद्धा पाहिलंच असेल. तुम्हाला प्रश्न पडला का, एवढ्या मोठ्या किमतीची दारू एकाच माणसाला विकण्याची परवानगी देण्यात आली आहे का? नसेल तर हे शक्य कसं झालं?
चला तर या बिल मागची गोष्ट जाणून घेऊया.
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, किरकोळ मद्य विक्री दुकानांना दररोज २.६ लिटरपेक्षा जास्त परदेशी दारू (IMFL) किंवा १८ लिटर पेक्षा जास्त बिअर एका ग्राहकाला विकता येणार नाही. बंगलोरच्या स्पिरीट झोनने हा नियम पूर्णपणे मोडला आहे. त्यांनी एकाच ग्राहकाला तब्बल १३.५ लिटर दारू आणि ३५ लिटर बियर विकली आहे.
बिल व्हायरल झाल्यानंतर याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यांनी याबद्दल जाब विचारल्यावर स्पिरीट झोनच्या मालकाने म्हटलं, की एकूण ८ जणांनी मिळून ५२,८०० रुपयांची खरेदी केली होती. एकाच कार्डने पैसे चुकते केल्याने एकच एक बिल तयार करण्यात आलं.
या कारणावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यात आलेला नाही. उत्पादन शुल्क विभागाने याची चौकशी सुरु केली आहे. नेमकं कारण शोधून काढल्यानंतरच काय कारवाई होणार हे ठरवलं जाणार आहे.
तसं पाहिलं तर हे पाहिलंच बिल नाही. याच्याही वरताण असलेलं एक बिल सध्या व्हायरल होत आहे. या बिल वर विश्वास ठेवला तब्बल ९४,३४७ रुपये एवढ्या दारूची खरेदी झाली आहे. या बिलवर दुकानाचं नाव दिसत नाही, पण तारीख, फोन नंबर आणि शहराचं नाव स्पष्ट दिसत आहे.
तर मंडळी, काय म्हणाल याबद्दल? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.