computer

डॉनल्ड ट्रम्पचं ट्विटर सस्पेंड करणारी 'ही' भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?

आपल्या मनासारखं झालं नाही की लहान मुलं जसं रडून, आरडाओरडा करून, हातपाय आपटून गोंधळ घालतात तसंच काहीसं सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राजमान्य राजश्री डॉनल्ड ट्रम्प करत आहेत. गेल्या आठवड्यात तर या गोंधळाने सर्वोच्च बिंदू गाठला. डॉनल्ड ट्रम्पच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर (अमेरिकेचं संसद भवन) हल्ला केला आणि पोलिसांशी झटापट केली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला.

कॅपिटल बिल्डींगमध्ये ट्रम्प समर्थकांनी राडा केला याला पार्श्वभूमी आहे ती ट्रम्प यांनी ट्विटरवरून केलेल्या चिथावणीखोर विधानांची. याची शिक्षा म्हणून ट्विटर या कंपनीनं ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यात ट्विटरमधल्या एका भारतीय वंशाच्या महिलेची प्रमुख भूमिका होती. विजया गड्डे हे त्यांचं नाव. त्या ट्विटरमध्ये कायदे आणि धोरण ठरवणाऱ्या समितीच्या प्रमुख आहेत. विजया गड्डे यांनीच डॉनल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.

त्यांचा जन्म हैदराबादचा. ४५ वर्षांच्या विजया गड्डे ट्विटर लॉ, पब्लिक पॉलिसी तथा ट्रस्ट आणि सिक्युरिटीच्या प्रमुख आहेत. त्यांच्यावर ट्विटरचे नियम बनवणे आणि लागू करण्याची जबाबदारी आहे. विजया गड्डे यांचा जन्म भारतात झाला तरी त्या लहान असतानाच त्यांचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं.

गड्डे यांचे वडील मेक्सिकोतील तेल संशोधन कंपनीत केमिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. न्यू जर्सीमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विजया गड्डेंनी कार्नेल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लॉस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं कायदेशीर सल्लागार म्हणून लॉ फर्ममध्ये नोकरी केली. ही कंपनी स्टार्टअप कंपन्यांना कायदेशीर मार्गदर्शन करायची. २०११ मध्ये त्या ट्विटरमध्ये जॉईन झाल्या. कॉर्पोरेट वकील म्हणून त्यांचं काम सुरू झालं. ट्विटरसंदर्भातल्या अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2020 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विटरवरून राजकीय प्रचार आणि जाहिराती यांवर बंदी घालण्याचा निर्णयही विजया यांचाच. त्यांनी न्यूयॉर्क लॉ युनिव्हर्सिटी स्कूलच्या विश्वस्त मंडळावरही काम केलं आहे. याशिवायत्या एंजेल्स या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत.

युएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातली गेली. याशिवाय ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्यात आलंय. जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत डॉनल्ड ट्रम्प फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट वापरू शकणार नाहीत. ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं तेव्हा त्याचे ८.८७ कोटी फॉलोअर्स होते आणि ते स्वतः ५१ जणांना फॉलो करायचे.

पण ही कारवाई एका रात्रीत घडून आलेली नाही. मागील काही महिन्यांपासूनच ट्विटरचं ट्रम्प यांच्या ट्विट्सवर आणि ट्विटर अकाऊंटवर खास लक्ष होतं. ट्रम्प यांची अनेक ट्विट्स हे फ्लॅग म्हणजेच या ट्विटमधील दावा खरा आहेच असं नाही अशा पद्धतीने मार्क केली जायची, हीही गोष्ट विशेष उल्लेखनीय होती. 

इन्स्टाईल या मासिकाने 'जग बदलणाऱ्या पहिल्या ५० जणांच्या यादीमध्ये विजया गड्डे यांना स्थान दिलं आहे.  हे त्यांनी नुकत्याच केलेल्या कारवाईमधून दाखवून दिलं आहे.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required