चहावाल्यांनी चहा विकून केली जगाची सफर...वाचा या जोडप्याची भ्रमणगाथा !!

एका साध्या चहावाल्याला जगाच्या सफरीवर जायचं असेल, तर त्याला काय करावं लागेल ? (आम्ही मोदींबद्दल बोलत नाही आहोत !! आधीच सांगून ठेवतो) सर्वात आधी तर ही इच्छाच कायच्या काय मोठी आहे. कटिंग चहा विकून कोणी जगाची सफर करणं शक्यच नाही, पण प्रत्येक अशक्य गोष्टीला शक्य करता येतं. त्यासाठी पैसे नाही तर जिद्द लागते. आता या जोडप्याचीच गोष्ट बघा ना !!
हे आहेत कोची येथे राहणारे विजयन आणि मोहना. दोघांचंही वय आज सत्तरीच्या पुढे आहे. त्यांनी तरुणपणी जगाच्या सफरीवर जायचं स्वप्न बघितलं होतं. आणि आज ५० वर्षांनी त्यांचं स्वप्न साकार झालं आहे. दोघांचेही व्यवसाय बघून हे स्वप्न पूर्ण तरी कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडेल भाऊ. दोघेही चक्क कोचीचे चहावाले आहेत.
मंडळी, केरळ मधील चहाचं सगळ्यात फेमस दुकान कोणतं असेल तर ते विजयन आणि मोहना यांचं ‘श्री बालाजी कॉफी हाउस’ . १९६३ साली या दुकानाची स्थापना झाली. अगदी काही दिवसात इथल्या चहाने देशी आणि विदेशी पर्यटकांच मन जिंकलं. पण कितीही प्रसिद्ध असलं तरी आहे ते चहाचं दुकानच. दोघांनी जमवून जमवून किती घबाड जमवलं असेल त्यांना वर्ल्डटूर शक्य झाली?
तर त्याचं असं आहे, रोजचा खर्च वाचावा म्हणून त्यांनी आपल्या दुकानात नोकर ठेवलेले नाहीत. ते स्वतःच सर्व कामं करतात. त्यांनी आपला खाजगी खर्चही कमी ठेवला आहे. अशा लहानसहान बचतीतून त्यांनी रोज ३०० रुपये साठवले. जेव्हा हे पैसेही कमी पडले तेव्हा बँकेतून कर्जही घेतलं. या पैश्यांच्या बळावर त्यांनी १६ देशांची सफर केली. परतल्यानंतर नव्याने पैसे साठवून आणि कर्ज घेऊन नवीन सफरीची योजना आखली. अशा प्रकारे त्यांनी आजवर तब्बल २३ पेक्षा जास्त देश पालथे घातले आहेत.
त्यांच्या या जिद्दीमुळे आनंद महिंद्रा यांनी त्यांना ‘भारतातील सर्वात श्रीमंत लोक’ म्हटलंय.
मंडळी, या जोडप्याची आता जगभर चर्चा आहे. २०१५ साली जेव्हा ते अमेरिकेला गेले तेव्हा लोकांनीच त्यांच्या प्रवासाची काळजी घेतली. एवढंच काय अनुपम खेर यांनी त्यांना आर्थिक मदतही देऊ केली आहे.
विजयन यांना लहानपणापासून भ्रमंती आवडायची. त्यांना या संपूर्ण प्रवासाबद्दल विचारण्यात आलं तेव्हाते म्हणाले ‘मला या प्रवासाने संपूर्णपणे बदलून टाकलं आहे.’....
मंडळी, मोठी स्वप्न बघताना ती पूर्ण होणार का अशी शंका येत असेल तर या जोडप्याची गोष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल. अशा या ‘श्रीमंत जोडप्याला’ बोभाटाचा सलाम !!