computer

जगभरातली प्राचीन स्थळे एकाच रेषेत जोडली गेली आहेत?? ले लाईन्सचं गूढ काय आहे?

या जगात अश्या अनेक गूढ गोष्टी आहेत ज्यावर अनेक वर्ष संशोधन, चर्चा चालू आहे. ही रहस्ये आपल्याला समजावीत म्हणून अनेकजण त्यांना विज्ञानाच्या आधारावर सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतात. पण कधी कधी ठोस सांगता येत नाही. ले लाइन्स बद्दलही असंच काहीसं आहे. या रेषा बरंच गूढ निर्माण करतात. आज त्याविषयी जाणून घेऊयात.

१९२१ मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ अल्फ्रेड वॅटकिन्स यांनी पृथ्वीवरच्या काही सरळ रेषांचा शोध लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार जगभरातली वेगवेगळ्या ठिकाणची प्राचीन स्थळे ही एक सरळ रेषेत जोडली गेली आहेत. त्यातली काही स्थळे ही माणसाने बनवली आहेत तर काही नैसर्गिक आहेत. म्हणजे समजा आपण जगाचा नकाशा पहिला तर ही स्थळे एका सरळ रेषेतच जोडली गेली आहेत. या रेषांना त्यांनी ले लाईन असे नाव दिले. त्यांनी अनेक उदाहरणे दाखवून हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. यामूळे एक वेगळ्या अलौकिक आणि आध्यात्मिक जगाचे दरवाजे उघडले गेले. यावर काही लोकांनी विश्वास ठेवला, तर अनेकांनी त्यांची चेष्टा केली.

वॅटकिन्स यांच्या शोधानुसार पृथ्वीच्या नकाशावर जश्या अक्षांश, रेखांशच्या रेषा आहेत त्याप्रमाणे या ले लाईन्स आहेत. यात अनेक स्मारके, प्राचीन स्थाने आहेत जिथून काही नद्या वाहतात. या नद्या ज्याठिकाणी ले लाईन्सला छेदतात त्याठिकाणी एक अलौकिक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा फक्त काही ठराविक व्यक्तीच वापरू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काही विशेष व्यक्ती आढळतात ज्यांच्याकडे सर्वसामान्य लोकांपेक्षा काही गूढ शक्ती असते.

ले लाईन्सचे पुरावे देण्यासाठी वाटकिन्स काही उदाहरणेही देतात. ते सांगतात आयर्लँडच्या दक्षिणेकडील टोकापासून इस्राईलपर्यंत एक सरळ रेष म्हणजे ले लाईन आहे. ज्यामध्ये अशी सात जागा किंवा स्थळे आहेत ज्यांचे नाव “मायकेल” असे आहे. आणि हे सातही भूभाग एका सरळ रेषेतच आहेत. 

त्यांनी दिलेल्या अजून एका उदाहरणातून तर या ले लाईन्स बद्दलचे रहस्य अजून उलगडले आहे. इजिप्तचे ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गिझा, मेक्सिकोचे चिचेन इत्झा(Chichen Itza) आणि इंग्लंडचे स्टोनहेंज (Stonehenge) या तिन्ही जागाही ले लाईन नुसार एकाच रेषेत येतात. पुरातत्वशास्त्रज्ञांना इथले ऐतिहासिक बांधकाम आजही अचंबित करते. इथे असलेली अद्भुत ऊर्जाही ले लाईन्स असल्याचे पुरावे देते. नकाशावर नीट पाहिल्यास हा दावा खरा ठरतो.

वॅटकिन्सच्या या दाव्यावर खूप चर्चा होते. या गोष्टी म्हणजे केवळ एक योगायोग आहे असे म्हणले गेले. पॉल देवरेक्स नावाच्या एका संशोधक म्हणतो  ले लाईन्स ही संकल्पना बोगस आहे आणि असे काहीच अस्तित्त्वात नाही. पॅरानॉर्मल एनकाऊंटरचे लेखक जेफ बेलेंगर यांच्या मते ले लाईन्स याचे अस्तित्व आहे. ले लाईन्सच्या पलीकडेही पृथ्वीवर काही गूढ अस्तित्वात आहे का याविषयी अभ्यास व्हायला हवा. 

ले लाईन्स बद्दलच्या रहस्यावर पुस्तके लिहिली गेली, सिनेमे आले, खूप चर्चाही झाली. हा फक्त योगायोग, गूढ की अजून काही याबद्दल विज्ञानात स्पष्ट पुरावे नाहीत. काही रहस्यमय गोष्टी या माणसाच्या समजण्यापलीकडच्या असतात! ले लाईन आणि ती अद्भुत शक्ती हेच तर सांगत नाहीत ना?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required