computer

अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू पुढे काहीच का करू शकला नाही ? उन्मुक्त चंदचे पुढे काय झाले?

२००७ साली भारताने टी ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकला. धोनी फॉर्मात आला. त्याच्या काही महिन्यांनी भारताने अंडर १९ वर्ल्डकप जिंकला. एक १९ वर्षांचा मुलगा फॉर्मात आला. नाव होते विराट कोहली. आजच्या घडीला धोनी आणि विराट महान क्रिकेटपटूंच्या यादीत जाऊन पोहोचले आहेत. असाच एक खेळाडू होता, ज्याच्याकडे विराटला मागे टाकण्याची क्षमता आहे असे म्हटले जात होते. 

आजपासून ७-८ वर्षांपूर्वी जे क्रिकेट बघत होते, त्यांना उन्मुक्त चंद हे नाव आठवत असेल. पठ्ठ्या वादळाप्रमाणे आला आणि तेवढ्याच जोरात गायब झाला. २०१२ चा अंडर १९ वर्ल्डकप त्याने भारताला जिंकून दिला. उन्मुक्त चंदची बॅटिंगची आपली वेगळी स्टाईल होती. त्याची बॅटिंग आणि मैदानावरील वावर बघून गडी लंबी रेस का घोडा आहे हे सर्वांनी ठरवून टाकले होते.

विराट कोहली नंतर हाच दुसरा विराट हे तर ठरलेच होते. कारण, दोन्ही मूळ दिल्लीचे, तसेच दोघांची सुरुवात भारताला अंडर १९  वर्ल्डकप जिंकून देऊन झाली होती. दोन्ही खेळाडू स्टायलिश होते. मैदानावर आक्रमकपणे वावरत असत. उन्मुक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भुकेने व्याकुळ झालेल्या सिंहाप्रमाणे धावा काढत होता. भारतातील प्रत्येक दिग्गज खेळाडू त्याला बघून चाट पडत होता. 

उन्मुक्त चंदचा आत्मविश्वास दांडगा होता. अंडर १९ वर्ल्डकप जिंकल्यावर त्याने पुस्तक लिहिले, ‘द स्काय इज द लिमिट- माय जर्नी टू द वर्ल्डकप’. या पुस्तकाची प्रस्तावना थेट वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर सर व्हिव्हीयन रिचर्ड यांनी लिहिली होती. पुस्तकाच्या कव्हरवर विराटने लिहिलेली एक लाईन होती, 'व्हेरी स्पेशल प्लेयर.' 

असा हा उन्मुक्त चंद पुढे मात्र चांगली कामगिरी करू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने तो अपयशी ठरत होता. गोष्ट इथवर घसरली की २०१८ सालच्या आयपीएलमध्ये त्याला कुणीही खरेदी केले नाही. एवढा प्रतिभाशाली खेळाडू ज्याला खरेदी करण्यासाठी लाईन लागेल असे वाटत होते त्याला कुणीही खरेदी केले नाही.

मग भाऊ उतरला विजय हजारे ट्रॉफीत. डॉक्टरांनी सल्ला दिला, आराम कर खेळू नको, पण यावेळी तो जिद्दीने पेटला होता. बॅटिंगला उतरला तेव्हा त्याच्या तोंडाला पट्टी बांधली होती. लोकांना २००२ साली अनिल कुंबळेने जबडयाला लागल्यावर पट्टी बांधून बॉलिंग केली होती ते आठवले. या सामन्यात त्याने जखमी अवस्थेत ११६ धावांची तुफान खेळी केली. लोकांना वाटले वाघ आता परत आला. 

त्याने एका मुलाखतीत आपण एकच बॉल १२ पद्धतीने खेळण्याची पद्धत तयार केली असल्याचे सांगितले. सचिन तेंडुलकर देखील एक बॉल ५ पद्धतीने खेळू शकतो, तेव्हा उन्मुक्तचे हे बोलणे बघून कुणालाही पठ्ठ्या आता जोरदार पुनरागमन करेल असेच वाटणार.  

पण पुन्हा त्याच्या हाती अपयश लागले. ज्यांना २०१२ ते २०१४ चा काळ आठवतो, त्यांना माहीत असेल उन्मुक्त चंदवर भारताचेच नाहीतर जगाचे डोळे लागले होते. स्टायलिश लूक, कमी वयात मिळालेले ग्लॅमर, क्रिकेटचा फॉर्म यामुळे त्याला जाहिराती देखील भरपूर मिळाल्या, पण हे काहीही टिकून राहिले नाही. 

मागून आलेल्या अनेक खेळाडूंनी कुणाच्या ध्यानीमनी नसताना आयपीएल आणि इतर स्पर्धांमध्ये चांगली खेळी करून भारतीय संघात जागा पटकावली. पण प्रकाशझोतात येऊन ८ वर्षे उलटून देखील उन्मुक्त चंद अजूनही भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required