जाणून घ्या भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सॅल्युट एकमेकांपेक्षा वेगळे का असतात? 

स्वातंत्र्य दिनाला किंवा प्रजासत्ताक दिनाला टिव्हीवर तुम्ही भारतीय सेनेची परेड पाहिलीच असेल. तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून आपल्या राष्ट्रपतींना आणि भारतीय तिरंग्याला सलाम केला जातो. हा सॅल्युट म्हणजे सशस्त्र सेनेकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असतो. पण तुम्हाला माहीतीये का? भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही दलांकडून दिल्या जाणाऱ्या सॅल्युटमध्ये थोडा फरक आहे. काय आहे हा फरक? आणि का आहे बरं तो? चला जाणून घेऊया... 

भारतीय भूसेना/थलसेना

स्त्रोत

भारतीय भूसेनेकडून दिला जाणारा सॅल्युट हा तळवा पूर्ण खुला ठेवून आणि समोरासमोर केला जातो. यावेळी हाताचा अंगठा आणि बोटे एकमेकांना चिकटलेली असतात आणि मधलं बोट हे नेहमी भुवई किंवा टोपीला स्पर्श करत असते. हा सलाम आपल्या हातात कोणतंही शस्त्र नसल्याची जाणीव करून देत एकमेकांमधील विश्वास दृढ करतो.

 

भारतीय नौसेना

स्त्रोत

भारतीय नौसेनेकडून केल्या जाणार्‍या सॅल्युटमध्ये हाताचा तळवा हा कपाळाशी ९० अंशाचा कोण करत पुर्णपणे जमिनीच्या दिशेने वळलेला असतो. जहाजावर काम करताना तेलकट आणि मळकट झालेल्या हातांनी सॅल्युट केल्यामुळे होणारा वरिष्ठांचा अपमान टाळण्यासाठी सॅल्युट करण्याची ही पध्दत विकसीत झाली असावी असं सांगितलं जातं. 

भारतीय वायुसेना

स्त्रोत

२००६ मध्ये भारतीय वायुसेनेने आपली नवीन सॅल्युट करण्याची पध्दत विकसित केली. याआधी वायुसेनेचा सॅल्युट हा भूसेनेसारखाच होता. नवीन पध्दतीनुसार भारतीय वायुसेनेकडून केल्या जाणाऱ्या सॅल्युटमध्ये हात हा नौसेनेकडून केल्या जाणार्‍या सॅल्युटपेक्षा किंचीत वरच्या दिशेने उचलेला असतो. आणि तो जमिनीशी ४५ अंशाचा कोन करत असतो. म्हणजेच भूसेना आणि नौसेनेकडून केल्या जाणार्‍या सॅल्युटदरम्यानची ही मधली स्थिती आहे. वरच्या दिशेने उचललेला हा तिरका सॅल्युट वायुसनेच्या गगनभरारीला निर्देशित करतो.


पाह्यलंत, छोट्या गोष्टींतही कसा मोठा अर्थ दडलेला असतो ते... 

बोभाटाच्या सर्व वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

सबस्क्राईब करा

* indicates required