खाजवा की डोकं : महिलांच्या शर्टची बटन्स डाव्या बाजूला का असतात ? 

      तुम्ही पाहीलं असेल की महिलांच्या शर्टांची बटनं ही डाव्या बाजूला असतात. याउलट पुरूषांच्या शर्टांची बटनं उजव्या बाजूला लावली जातात. आता हा भेदभाव का? असा प्रश्न काही जिज्ञासूंना पडला असेलच. भेदभाव वगैरे काही नाही हो, पण यामागं काही कारणं सांगितले जातात. अर्थातच ही कारणं ज्याकाळात आधुनिक शर्ट तयार केले गेले, त्या काळातली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी, की ती कारणं आता नाहीशी झाली असली तरी आपण अजून तेव्हाचेच शर्टांच्या बटनांचे नियम पाळत आहोत. आहे की नाही गंमत!!

                 एक तर्क असा सांगितला जातो की पूर्वी पुरुष स्वतःचे कपडे स्वतःच घालायचे, पण स्त्रियांना मात्र दुसर्‍या स्त्रिया कपडे घालायला मदत करायच्या.  त्यावेळचे लोक सगळी कामं ही उजव्या हातानेच करायचे. म्हणजेच त्या मदतनीस बायकाही त्यांचे उजवे हात वापरायच्या.  म्हणून कदाचित स्त्रियांच्या कपड्यांवर डाव्या बाजूला बटनं लावली जात. 

दुसरा तर्क असा आहे की पुर्वीचे पुरुष हे आपल्या उजव्या हातात तलवार पकडायचे तर स्त्रिया आपल्या डाव्या हातात आपल बाळ पकडायच्या. अर्थात अजूनही त्या शक्यतो बाळाचं डोकं डाव्य बाजूला येईल असं त्याला धरतात. यासाठी सुलभता म्हणून कदाचित  अशी उलटी बटनं लावण्याची अशी वेगवेगळी पध्दत सुरू झालेली असू शकते. 

काही लोक असंही सांगतात की पूर्वी स्त्री-पुरुषांच्या वेशभूषेत फरक होता, पण आता आधुनिक काळात तो कमी झालाय. त्यामुळे  एक ओळख म्हणून ही बटनं अशी वेगवेगळ्या बाजूला लावली जातात. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही पध्दत नेपोलियनने सुरू केली. नेपोलियनला नेहमी आपल्या शर्टमध्ये हात घालून थांबण्याची सवय होती. त्याची नक्कल अनेक महिला करू लागल्या. यावर बंधन म्हणून नेपोलियनने स्त्रियांच्या कपड्यांचे बटन डाव्या बाजूला लावण्याचा आदेश दिला.

खरं कारण काहीही असो, आजच्या युनिसेक्स जमान्यातही कित्येक शतकांआधी केलेले नियम कपड्यांच्या बाबतीत पाळले जातात हे जरा अतिच झालं. नाही का? 

सबस्क्राईब करा

* indicates required