computer

याहू बंद होण्याची बातमी येत आहे? नक्की खरं काय ते जाणून घ्या!!

आज आपल्याला गूगल म्हणजे सबकुछ वाटतं. नव्या पिढीला तर गूगल पलिकडे काही असेल असे वाटतही नसेल. अर्थात गूगलनं ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य व्यापलं आहे, ते पाहता त्यात काही चूकही नाही. पण एकेकाळी असंच गारूड याहू!नं लोकांच्या मनावर केलं होतं. त्यात "याहू!" नावामुळे भारतीयांना जरा जवळचंही वाटायचं. अर्थात तसा याहू! कंपनीचा आणि शम्मी कपूरांचा काही संबंध नव्हता. पण तेही तंत्रज्ञानाचे चाहाते होते आणि याहू!ने मुंबईतल्या ऑफिसच्या उद्घाटनाला शम्मींना आमंत्रित केले होते.

असो. आजही तिशी ओलांडलेल्या लोकांना त्यांचे याहूचे दिवस आठवत असतील. काहींचा पहिला इमेल आयडी याहूचा असेल. याहू चॅटरूम्स, ASL म्हणजे त्याकाळचे "J1 झाले का?", याहूग्रुप्स हे सगळं स्वच्छ आठवत असेल. पण काळाबरोबर काही गोष्टींच्या जागा नव्या गोष्टी घेतात. तसं याहू!चंही झालं आहे.

२०१७साली याहू व्हेरिझोनने अखेरीस 4.38 बिलियन डॉलरला विकत घेतली होती. या नव्या कंपनीने याहू!ला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. आता याहू!चं मुख्य अंग असलेला याहू! ग्रुप बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. १५ डिसेंबरपासून याहू! ग्रुप बंद होत आहे.

गूगल ड्राईव्ह आलं असलं तरी अजूनही बरेच लोक याहू!ग्रुप्स वापरत आहेत. त्यामुळे या बातमीनंतर ग्रुपकडून आलेले किंवा ग्रुपवर पाठवलेल्या इमेल्सचं काय होणार याची काही लोकांना चिंता वाटतेय. याबद्दल व्हेरिझोनने खुलासा केला आहे की "तुमच्याकडून पाठविण्यात आलेले किंवा तुम्हाला आलेले इमेल्स जसेच्या तसे राहतील. पण १२ऑक्टोबरपासून याहू!ग्रुप्सवर नविन ग्रुप बनवता येणार नाहीत, १५ डिसेंबरनंतर याहू ग्रुप्सवर इमेल पाठवता येणार नाही किंवा तुम्हांला कुठला इमेल येणार नाही."

याहू युझर्ससाठी हा धक्का असला तरी गेल्या काही वर्षांपासून याहू वापरकर्त्यांची संख्या वेगाने घटत होती. म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. इंटरनेटवर लोक याहूच्या आठवणी शेयर करत हळहळत आहेत.

२००१साली याहू!ग्रुप्स ही याहू! सर्व्हिस चालू करण्यात आली होती. पण गुगल ग्रुप्स आणि त्यांच्या इतर सर्व्हिसेसच्या लोकप्रियतेसमोर याहू!ग्रुप्स टिकाव धरू शकले नाहीत.

सबस्क्राईब करा

* indicates required