computer

तृतीयपंथीयांचे शिलेदार: भेटा भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील सत्यश्री शर्मिला यांना!!

तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. पण अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. अशाच काही कर्तृत्ववान तृतीयपंथीयांची ओळख करून देण्यासाठी बोभाटा नवीन लेखमालिका घेऊन येत आहे.

आजच्या पहिल्या भागात भेटूया वकील सत्यश्री शर्मिला यांना!!

सत्यश्री या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील आहेत. त्यांनी तमिळनाडू आणि पॉंडेचेरी बार कॉन्सिलमध्ये नोंदणी करत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील होण्याचा मान पटकावला आहे.

इतर अनेक तृतीयपंथीयांप्रमाणे शर्मिला यांचा प्रवास देखील अंगावर काटे आणणारा आहे. शर्मिला यांचा जन्म तमिळनाडू येथील रामनाथपूरम येथे उदयकुमार म्हणून झाला. जन्मापासून एक पुरुष अशीच त्यांची ओळख होती. शर्मिला या जसजसे मोठ्या होत गेल्या तसतसे त्यांना स्वतःच्या लैंगिकतेबद्दल जाणीव व्हायला लागली. या काळात त्यांनी बी-कॉम पूर्ण करून लॉ चे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पुढे त्यांना स्वतःच्या लैंगिकतेबद्दल जाणिव झाली. त्यांची लैंगिकता वेगळी असल्याने त्यांना इतरांकडून त्रास सहन करावा लागला. त्यांना होणारा त्रास हा इतका होता की त्यांना नाईलाजाने घर सोडून निघून जावे लागले.

शर्मिला यांचे मूळ नाव उदयकुमार असल्याने त्यांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहावे लागत असे. बराच त्रास आणि अवहेलना सहन करून त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. पण शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या लगेच त्या वकील झाल्या असे झाले नाही. वकिलीची पदवी घेतल्यावर त्यांना वकील म्हणून मान्यता मिळायला ११ वर्षे जावी लागली. २००७ साली त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले, तर वयाच्या ३६ व्या वर्षी २०१८ मध्ये त्यांची बार कॉन्सिलमध्ये नोंदणी झाली. इतकी वर्षे प्रतीक्षा करून जेव्हा त्यांची वकील म्हणून नोंद झाली, तेव्हा त्या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील झाल्या होत्या. या ११ वर्षाच्या काळात त्यांनी तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वेळोवेळी लढा दिला.

शर्मिला सांगतात, "आपण आपल्या आयुष्यात खूप जास्त चढउतार बघितले आहेत. एवढा संघर्ष करून इथवर पोहोचल्यावर आपल्या समुदायातील लोकांनी चांगले काम केले पाहिजे यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत."

शर्मिला या जेव्हा एका तृतीयपंथीय समुदायातील व्यक्ती म्हणून न्यायालयात उभ्या राहतील तेव्हा निश्चितच तृतीयपंथीय समुदायातील लोकांना लढण्याची प्रेरणा मिळेल. आपल्यातली एक व्यक्ती ही उंची गाठू शकते, तर आपण देखील त्या उंचीवर जाऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात नक्कीच निर्माण होईल.  शर्मिला यांच्याआधी जोयिता मंडल यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश झाल्या होत्या. जोयिता यांची नियुक्ती पश्चिम बंगालमधील इस्लामपूर न्यायालयात करण्यात आली होती.

 

आणखी वाचा:

जोयिता मंडल : भिकारी ते न्यायाधीशापर्यंतचा प्रवास !!

सबस्क्राईब करा

* indicates required