computer

गनिमी काव्याचा वापर करून अनेक नाझी सैनिकांना टिपणार्‍या फ्रेडी ओव्हरस्टिगन या मुलीची वीरगाथा

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी सैनिकांनी ज्यूंचा मोठ्या प्रमाणावर संहार केला, हे सर्वांना माहिती आहे. त्यादरम्यानची ॲन फ्रँकची डायरी आणि ॲन सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्याचवेळी एक ज्यू मुलगीनेही गनिमी काव्याचा वापर करून अनेक नाझी सैनिकांना टिपले हे बहुतेकांना माहित असत नाही. या मुलीचे नाव होते फ्रेडी ओव्हरस्टिगन. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वयाच्या चौदाव्या वर्षी ती डच रेझिस्टन्स नावाच्या संघटनेची सभासद झाली. त्यानंतर दोनच वर्षांत तिच्या हातात शस्त्रे आली आणि तिने ज्यूंवर झालेल्या अत्याचारांचा बदला घ्यायला सुरुवात केली. आपली बहीण ट्रुस आणि सहकारी हॅनी शाफ्ट यांच्या मदतीने तिने अनेक नाझी व डच सैनिकांना ठार मारले.

फ्रेडी आणि तिची मोठी बहीण ट्रुस या हारलेम शहरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची आई कम्युनिस्ट होती. तिने आपल्या मुलींवर अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार केले. १९३९ मध्ये युरोप दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना तिने स्वतः अनेक ज्यू निर्वासितांना थारा दिला होता. यातूनच फ्रेडी आणि ट्रुस यांना, नडलेल्याला मदत करण्याची आणि त्यागाची शिकवण मिळाली. १९४० मध्ये नाझींनी नेदरलँड्सवर हल्ला केला. त्याला उत्तर म्हणून या मुलींनी नाझींच्या विरुद्ध लढ्यात उडी घेतली. आपल्या आईसह त्यांनी नाझींच्या विरोधात प्रचारसाहित्य आणि वर्तमानपत्रे वाटायला सुरुवात केली.

ही कामे चांगलीच धोक्याची होती. चुकून जरी त्या पकडल्या गेल्या असत्या तरी त्यासाठी थेट मृत्युदंडाचीच शिक्षा होती. पण एक गोष्ट त्यांच्यासाठी अनुकूल होती. त्या दोघी तरुण होत्या. त्यामुळे सैनिकांना त्यांचा संशय येण्याची शक्यता फारच कमी होती. फ्रेडी तर वेणी घातल्यावर अजूनच लहान दिसत असे. कदाचित याचमुळे १९४१ मध्ये हारलेम रेझिस्टन्स ग्रुपच्या कमांडरने त्यांच्या आईकडे त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी परवानगी मागितली. आईनेही तयारी दर्शवली आणि या बहिणी संघटनेत आल्या. आपल्याला येथे काय करायचे आहे हे त्यांना नंतर समजले. त्यांच्या कामांमध्ये पूल उडवून देणे, रेल्वे लाईन्स उद्ध्वस्त करणे, बंदुकीच्या साहाय्याने नाझींना टिपणे यांचा समावेश होता.

ह्या दोघी बहिणी आपले रूप आणि तारुण्य यांचा वापर करून आधी जर्मन सैनिकांना आपल्या जाळ्यात ओढत. गोड बोलून त्यांच्याशी लगट करण्याचे नाटक करत आणि त्यांना जंगलात किंवा रस्त्याकडेला असलेल्या दाट झाडीत घेऊन जात. तिथे त्यांच्या संघटनेचा एखादा सैनिक दबा धरून बसलेला असे. तो मग त्या माणसाचा खातमा करी. पुढे त्या दोघी बंदूक चालवू लागल्या. मग माणसांना टिपण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. नंतरनंतर तर त्या स्वतंत्र मोहीम आखू लागल्या. त्याचबरोबर त्यांनी ज्यू लोकांची धरपकड करणाऱ्या डच सैनिकांना लक्ष्य करायला सुरुवात केली.

सगळ्या मोहिमांमध्ये मिळून त्यांनी किती लोकांना मारले याचा तपशील त्यांनी कधीही उघड केला नाही. मात्र एकदा का त्यांचे लक्ष्य ठरले की त्याचा पाठलाग करत त्या अगदी त्याच्या घरापर्यंत गेल्याची किंवा त्याला त्याच्या बाईकवरच ठार केल्याची उदाहरणे आहेत.

त्यांना ह्या कामात मदत करायला पुढे अजून एक स्त्री येऊन मिळाली. तिचे नाव होते हॅनी शाफ्ट. जर्मनीशी एकनिष्ठ राहायला तिने नकार दिल्याने तिला युनिव्हर्सिटीतून काढून टाकलेले होते. हिटलरचा दबदबाच असा होता! त्या तिघी एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी बनल्या. पण युद्ध संपायच्या केवळ तीन दिवस आधी हॅनी नाझी सैन्याच्या तावडीत सापडली. तिला मारून टाकले गेले.

 

युद्ध संपल्यावर लोकांना ठार केल्याचा आणि आपली जवळची मैत्रीण गमावल्याचा दोघींना खूप त्रास झाला. त्यांना त्यातून सावरायला बराच काळ लागला. ट्रुसने त्या काळात अनेक शिल्पे निर्माण केली. तिने युद्धादरम्यानच्या काळाबद्दल लेखनही केले. फ्रेडी लग्नसंसार, मुलेबाळे यांत रमली. मात्र एकंदर युद्धाचे ओरखडे पूर्णपणे पुसले गेले नाहीच.

फ्रेडी आणि ट्रुस दोघींनाही ९२ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. पण एकीकडे अनेकांचा जीव घेणे आणि दुसरीकडे माणसांप्रती संवेदना असणे अशा परस्परविरोधी भूमिकांमध्ये सापडून झालेला कोंडमारा सोडवणे त्यांना शेवटपर्यंत जमले नाही.

यासोबत हे ही वाचा..
या बाईंनी २५०० मुलं पळवली आणि त्यासाठी त्यांची नोबेलासाठी शिफारस झाली!! 

या बाईंनी २५०० मुलं पळवली आणि त्यासाठी त्यांची नोबेलासाठी शिफारस झाली !!


हिरोशिमा-नागासाकीबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हांला माहित आहेत का? 

हिरोशिमा-नागासाकीबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?


अणुबाँबमुळे बेचिराख झालेल्या हिरोशिमाने कशी भरारी घेतली याची गोष्ट? 

अणुबाँबमुळे बेचिराख झालेल्या हिरोशिमाने कशी भरारी घेतली याची गोष्ट?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required