computer

ऑक्टोपसच्या प्रत्येक हातात मेंदू असतो? जाणून घ्या ऑक्टोपसचा प्रत्येक हात स्वतंत्र विचार कसा करतो..

ऑक्टोपस इतर प्राण्यांना जमत नाही अशा काही गोष्टी करू शकतात. त्यांला कोडे सोडवता येते, स्वतःचा आकार-रंग बदलता येतो, त्याला जर बरणीत बंद केले तर बरणीचे झाकण उघडता येते, एवढंच नाही तर त्यांना स्वतःच्या जनुकांमध्ये बदल करता येतो. याहून चकित करणारी गोष्ट म्हणजे ऑक्टोपसच्या प्रत्येक हातांला स्वतःचा मेंदू असतो. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोपसचे हात स्वतंत्र विचार कसे करतात..

मेंदूचं कार्य चालवण्याचं काम मज्जातंतूवर असतं. जेवढे जास्त मज्जातंतू तेवढा जास्त मेंदू तल्लख. ऑक्टोपसच्या शरीरात ५० कोटी मज्जातंतू असतात. यातील अर्धे मज्जातंतू त्याच्या हातांमध्ये विभागलेले असतात. त्याच्या प्रत्येक हातामध्ये मज्जातंतू पेशींचा संच असतो. या मज्जातंतू पेशींद्वारे त्यांची हालचाल स्वतंत्रपणे नियंत्रित केली जाते. ऑक्टोपसच्या आठ हातांमध्ये आठ मेंदू असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

ऑक्टोपसच्या हातांवर फार पूर्वीपासून संशोधन होत आहे. या संशोधनातून हे सिद्ध झालंय की ऑक्टोपसचा हात शरीरापासून वेगळा केला तरी तो हालचाल करू शकतो, वस्तू पकडू शकतो आणि जरी तोंड शिल्लक नसलं तरी अन्न आपल्या तोंडाच्या दिशेने नेऊ शकतो.

नवीन संशोधन ऑक्टोपसच्या हातांच्या स्वतंत्र हालचालींना आणखी स्पष्टपणे समजून घेण्यास मदत करतं. वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या संशोधनानंतर ही क्रिया समजण्यासाठी एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ऑक्टोपसच्या शरीरात कशाप्रकारे मेंदूपर्यंत माहिती वाहून नेली जाते हे या व्हिडीओत आपण पाहू शकतो. काहीवेळा ही माहिती सरळ मेंदूपर्यंत न पोचवता ती हाताद्वारे नेली जाते.

या संशोधनातून हे तपासण्यात आलं की कोणती क्रिया मुख्य मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते आणि कोणती हातांद्वारे. जर दोन हात एकत्र हालचाल करत असतील तर ती क्रिया मुख्य मेंदू नियंत्रित करतोय, आणि जर हात स्वतंत्रपणे हालचाल करत असेल तर ती क्रिया हात स्वतः नियंत्रित करत आहे.

लेखक डॉमनिक सिव्हीटीली यांनी या क्रियेला “arm-up decision mechanism” म्हटलं आहे. सोप्प्या भाषेत ऑक्टोपसचा मेंदू स्वतंत्रपणे आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील माहिती जमा करू शकतो आणि  त्याप्रमाणे निर्णयही घेऊ शकतो. हे करत असताना तो मुख्य मेंदूची परवानगी घेत नाही. या वेगळेपणामुळे ऑक्टोपसला जलदगतीने निर्णय घेता येतात. कोणत्याही प्राण्याकडे नसेल अशा ८ वेगवेगळ्या मेंदूंनी त्याला काम करता येतं.

मंडळी, ऑक्टोपसच्या या गुणांना समोर ठेवून स्पायडरमॅन मासिकातील डॉक्टर ऑक्टोपस हा खलनायक तयार झाला. त्याचं सिनेमातील रूप तुम्ही पण बघितलं असेलच. या खलनायकाचे गुण बघितले तर समजेल की ऑक्टोपस जर माणूस असता तर तो किती घातक ठरला असता.

कशी वाटली ही माहिती? आम्हाला नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required