computer

मिशन गगनयान: इस्रोचं पहिलं-पूर्णत: भारतीय मानवी अंतराळयान आणि मानवी अंतराळवारी!! याची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या!!

अमेरिका आणि रशिया या दोन देशांनी शीतयुद्धाच्या काळात अवकाश संशोधनात प्रचंड वेगाने प्रगती केली. अर्थात याला या दोन देशांतील स्पर्धाही कारणीभूत होतीच. याच काळात वीस एक वर्षांचा एक तरुण देश सुद्धा अवकाश मोहिमेत उतरत होता. हा देश म्हणजे भारत. होमी भाभांच्या नेतृत्वात इस्रोची स्थापना झाली आणि इस्रोने नवनवीन मोहिमेतून आपणही अवकाश विज्ञानात प्रगती करू शकतो हे दाखवून दिले. पण आजवर इस्रोने मानवाला अवकाशात पाठवलं नव्हतं. लवकरच इतिहासात पहिल्यांदाच हे शक्य होणार आहे.

यापूर्वी भारताच्या राकेश शर्मा हा अंतराळवीर अंतराळात जाऊन आला होता. पण, ते रशियाच्या मानवी मिशनचे भाग होते. रशियाने आयोजित केलेल्या चांद्र योजनेतील राकेश शर्मा हे एक सहभागी अंतराळवीर होते. मात्र आता भारताने स्वतः गगनयान मिशनद्वारे आपले अंतराळवीर अंतराळ संशोधनासाठी पाठवण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २०२२ पर्यंत हे मिशन यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. 

यासाठी चार भारतीय अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली असून या चारही अंतराळवीरांना रशियाच्या गागारीअन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर (GCTC) मध्ये स्पेस ट्रेनिंग दिले जात आहे.  १० फेब्रुवारी रोजी हे चार अंतराळवीर रशियामध्ये गेले होते. रशियाच्या मॉस्को येथे असलेल्या या कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मधून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती. या चारही अंतराळवीरांचे हे प्रशिक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. अंतराळ भ्रमणासोबतच्या त्यांना सोयुझ एमडी क्रूड स्पेसक्राफ्टच्या सिस्टीमचाही अभ्यास करावा लागणार आहे. 

कोरोनामुळे काही काळ त्यांच्या अंतराळ प्रशिक्षणालाही खीळ बसली होती. मात्र आता परिस्थिती पूर्व पदावर आल्याने त्यांचे शेवटच्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.

गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी रशियाकडून आवश्यक ती मदत मिळावी यासाठी भारत आणि रशिया यांच्यात द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. भारताच्या या पहिल्यावहिल्या मानवी अवकाश संशोधन मोहिमेस रशियाने पाठींबा दर्शवला असून त्यासाठी मदत देण्याचे आश्वासनही दिले आहे. रशियाकडून भारतीय अंतराळवीरांना दिले जाणारे हे प्रशिक्षण हा भारत आणि रशिया यांच्या दरम्यान झालेल्या या कराराचा भाग आहे. 

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ह्युमन फ्लाईट स्पेस सेंटर (HSFC) आणि ग्लास्कोस्मोस यांच्यातील करारा नुसार चार भारतीय अंतराळवीरांना अवकाश यात्रेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येत असून. या अंतराळवीरांना आत्ता शेवटच्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जात आहे. हा टप्पा मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 

रशियाच्या या संशोधन संस्थेचे संचालक दिमित्री लोस्कूतीव्ह यांनी दिलेल्या माहिती नुसार या अंतराळवीरांना GCTC एक परीक्षा पास होणं गरजेचं आहे. 

फेब्रुवारीमध्ये या अंतराळवीरांना हिवाळ्यातील जंगलमय आणि दलदलीच्या प्रदेशात लँडींग कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. जून मध्ये त्यांना जलमय पृष्ठभागावर कसे लँडींग करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. तर जुलै मध्ये गवताळ प्रदेशावर कसे करायचे लँडींग करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

अंतराळ संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणात अनेक काठीण्य पातळ्या असतात. यातील प्रत्येक घटक अत्यंत महत्वाचा असतो. अवकाशातील वेगवेगळ्या पैलूंचा विचार करूनच हे प्रशिक्षण दिले जाते. अवकाशात गेल्यावर मानव वजनविरहित होतो. या स्थितीचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी या प्रयोगशाळेत II-76MDK हे एअरक्राफ्ट तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा काही काळ या एअरक्राफ्टवरही घालवावा लागतो. शिवाय रशियन भाषा शिकणे, सोयुझ स्पेसक्राफ्टची पद्धती त्याची रचना आणि कॉन्फिगरेशन शिकणे, हा सगळा त्यांचा प्रशिक्षणाचा एक नियमित भाग आहे. 

रशियातील प्रशिक्षण संपवून भारतात परत आल्यानंतरही या अंतराळवीरांना आणखीन खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. इथे आल्यावर त्यांचा दिनक्रम बराच अटीतटीचा असेल. बेंगळूरू, मुंबई आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आपले प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. बेंगळूरूच्या एअरोस्पेस मेडिसिन इन्स्टिट्यूट (आयएएम) कडून या अंतराळवीरांना काही प्रशिक्षण दिले जाईल. तसेच पुण्यातील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आणि नौदलाच्या नाव्हल मेडिसिन या संस्थाही या प्रशिक्षणात सहभागी होतील. 

गगनयान हे भारताचे पहिलेच मानवी अंतराळ यान आहे. हे अंतराळयान तीन लोकांसह अंतराळात प्रक्षेपण करणार आहे. ३.७ टन वजनाचे हे यान पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर जाऊन सात दिवस पृथ्वीभोवती प्रदिक्षणा घालणार आहे. अंतराळातील याचे भ्रमण पूर्ण होताच सुरक्षित रित्या या अंतराळयानाचे पृथ्वीवर लँडिंग केले जाईल. 

मानवी अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याआधी, एक प्रयोग म्हणून इस्रो एक मानवी रोबोट पाठवणार आहे. हा रोबोट अवकाशात माणसाप्रमाणेच वेगवेगळे प्रयोग करेल.गगनयान मिशन हा इस्रोचा एक अतिमहत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मानले जाते. अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या या रोबोटचे नाव आहे व्योममित्रा. भारताच्या या पहिल्याच मानवयुक्त अवकाश मोहिमेसाठी व्योममित्राही महत्वाची भूमिका बजावणार आहे.

पण अवकाशात जाणारे हे अंतराळवीर सात दिवस अवकाशात मुक्काम करणार आहेत तर त्यांच्या खाण्या-पिण्याचं काय? घरचा डब्बा अवकाशात नेऊन खाता येईल का त्यांना? अजिबात नाही! अवकाशात जाणाऱ्या या अंतराळवीरांसाठी तिथल्या वातावरणाचा अभ्यास करून खास पदार्थ बनवले जात आहेत. तेही प्रयोगशाळेत. म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबने यासाठी तयारी देखील सुरु केली आहे. अवकाशातील वातावरण, तिथल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन अंतराळवीरांसाठी या लॅबने खास पदार्थ बनवले आहेत. शिवाय त्यांना सोबत नेता यावीत यासाठी विशेष भांडी आणि अन्न गरम करण्यासाठी फूड हिटरही बनवण्यात आला आहे. 

भारताचं हे गगनयान २०२२ मध्ये आकाशात झेपावेल आणि अवकाश संशोधनासाठी मानवी यान पाठवणाऱ्या देशाच्या यादीत भारताचाही समावेश होईल. भारताच्या दृष्टीने खरे तर ही वैज्ञानिक प्रगतीची खूप मोठी झेप ठरणार आहे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

आणखी वाचा:

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

विष्ठा, उलट्या, रिकाम्या बॅगा, झेंडे.... अजून काय काय कचरा सोडून आलाय मानव चंद्रावर?

अंतराळात राहून हा माणूस चक्क चालणं विसरला? जाणून घ्या असं का झालं असेल..

सबस्क्राईब करा

* indicates required