computer

क्रिस्टिना कोचने सर्वाधिक दिवस अंतराळवासात राहण्याचा विक्रम केलाय!! काय काय केलं तिनं या ११ महिन्यांत??

आपण काही दिवस दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात गेलो तरी आपल्याला घराची आठवण येते. आज आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ती गेले वर्षभर चक्क अंतराळात होती.

नासाची अंतराळवीर क्रिस्टिना कोच ही अंतराळात तब्बल ३२८ दिवस राहून पृथ्वीवर सुखरूप परतली आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात सर्वात जास्त काळ राहणारी ती पहिली महिला ठरली आहे. हा रेकॉर्ड तिने २८ डिसेंबर २०१९ रोजीच मोडला होता. तिच्या पूर्वी हा रेकॉर्ड अंतराळवीर पेगी व्हिस्टन हिच्या नावे होता. पेगी २०१६-१७ साली अंतराळात २८८ दिवस राहिली होती.

शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्यासोबतच तब्बल ६ वेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रम तिने केला आहे. स्पेसवॉक म्हणजे अंतराळयानाबाहेर येऊन काम करणे. स्पेसवॉक हे फारच जिकरीचं असतं. यानाबाहेर येऊन कोणत्याही मदतीशिवाय काम करताना अनेक धोके असतात. क्रिस्टिनाचा विक्रम महत्त्वाचा आहे कारण तिने तब्बल ४२ तास १५ मिनिट स्पेसक्राफ्ट बाहेर घालवले आहेत.

क्रिस्टिनाने केलेल्या ६ पैकी एका स्पेसवॉकने इतिहास रचला आहे. क्रिस्टिना आणि तिची सहकारी जेसिका मेर या दोघी अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या पॉवर नेटवर्कच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर आल्या होत्या. यावेळी त्यांनी जो स्पेसवॉक केला तो केवळ महिलांनी केलेला इतिहासातील पहिला स्पेसवॉक होता. या घटनेची नोंद इतिहासात कोणत्याही पुरुष सहकाऱ्याशिवाय केला गेलेला पहिला स्पेसवॉक अशी झाली.

(क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर)

एवढे दिवस ती अंतराळात काय करत होती असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर, तिने वर्षभरात अंतराळात राहून महत्त्वाचे प्रयोग केले आहेत. याखेरीज ती स्वतःही प्रयोगाचा भाग होती. अवकाशाचा स्त्री शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी तिच्यावर अभ्यास होणार आहे. या अभ्यासाचा भविष्यातील अंतराळ मोहिमा आखण्यासाठी मदत होईल.

मंडळी, जाता जाता क्रिस्टिना कोचने पृथ्वीवर परतण्यापूर्वी घेतलेला पृथ्वीचा हा फोटो पाहून घ्या.

सबस्क्राईब करा

* indicates required