वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी कोणता कॅमेरा व कोणती लेन्स घ्यावी? सल्ला देत आहेत हौशी वाईल्डलाईफ फोटोग्राफर..

वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी कोणता कॅमेरा व कोणती लेन्स घ्यावी?

हा प्रश्न सर्व हौशी फोटोग्राफर्सना किंवा कोणत्याही वाइल्ड लाइफ प्रेमींना नेहमी पडतो. परंतु डिस्काउंट आहे म्हणून किंवा कोणीतरी घेतला म्हणून कॅमेरा खरेदी करू नये. आपल्याला नक्की कोणत्या प्रकारची फोटोग्राफी करावयाची आहे, त्यासाठी कुठली लेन्स गरजेची आहे याचा विचार करावा. निकॉन, कॅनन, ऑलिंपस, सोनी अशा कितीतरी नामांकित ब्रँडचे कॅमेरा व लेन्स बाजारात उपलब्ध आहेत. निकॉनचे- निकॉन ३४००, निकॉन ५३००, निकॉन ५६००, निकॉन D५०० ही मॉडेल्स प्रचलित आहेत, तर कॅनन EOS७००D, सोनी अल्फा A७ आणि इतरही नामांकित ब्रँडस बाजारात आहेत. आपले बजेट व आपल्याकडून होऊ शकणारा उपकरणाचा वापर याचा खरेदीपूर्वी विचार करावा.

[कॅनन EOS कॅमेरा ] स्रोत

आता महत्वाचा प्रश्न आहे तो निसर्ग आणि जंगलातलं प्राणीजीवन टिपण्यासाठी लेन्सची खरेदी..
आपल्याला कुठल्या प्रकारच्या फोटोग्राफीची आवड आहे हे प्रथम जाणून घ्यावे. कीटक, फुलपाखरे, फुले,बेडूक यासाठी मायक्रोलेन्स आवश्यक आहे. निकॉन, कॅनन या कंपन्यांच्या मायक्रोलेन्स १०५मिमी, १८०मिमी अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र पाण्याखालचे वन्यजीव टिपायचे असतील तर या लेन्सेस उपयोगाच्या नाहीत. त्यासाठीच्या कॅमेरा लेन्सेस वेगळ्या असतात. इतकंच नाही तर पक्षी निरीक्षण व पक्ष्याची फोटोग्राफी करायची असल्यास किमान ४०० मिमीची लेन्स हवी. ही लेन्स खूप चांगले परिणाम देते. शक्यतो सिग्मा, टॅमरॉन निकॉन, कॅनन या कंपन्यांच्या टेलिफोटोलेन्सची खरेदी करावी.

सिग्मा ५०-५००मिमी लेन्स स्रोत

त्याचप्रमाणे बाजारात उपलब्ध असणाऱ्या पण थोड्या महाग असलेल्या प्राईम लेन्सेसने अतिशय उत्कृष्ट फोटो काढता येतात.
लँडस्केप फोटोग्राफी म्हणजेच निसर्गचित्रणासाठी वाइड अँगल लेन्सेस वापरल्या जातात. साधारण जंगलात७०-२०० मिमी, २००-४०० मिमी, २००-५०० मिमी या रेंजमधल्या लेन्सेस सर्व ठिकाणी उपयोगी पडतात.

काही टिप्स- सुरवातीला आपल्याला नक्की कशात रस आहे हे ठरवावं, त्यानंतर आपलं बजेट आणि आपली आवड यांचा मेळ घालून मगच खरेदी करावी. साधारणपणे कोणतीही महाग लेन्स किंवा कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी त्या तात्पुरत्या भाडयाने घेऊन वापरून पाहाव्यात. त्यातूनही आपला कल, मिळू शकणारा वेळ, बजेट या सर्वांची सांगड घालता येईल.
कॅमेरा व लेन्स फक्त खरेदी करून चालत नाही, तर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः पावसाळ्यात तर आणखीच जास्त. आपली उपकरणं म्हणजे कॅमेरा आणि लेन्सेस नेहमी कोरड्या जागेत ठेवावीत. कव्हरमध्ये ठेवतानाही त्यात सिलिकॉन जेलचे पाउच ठेऊन योग्य ती काळजी घ्यावी. दमट वातावरणात कॅमेरा आणि लेन्सेसना बुरशी लागू शकते.

स्रोत

त्यासाठी खास कॅमेरा ठेवण्याची कपाटं मिळतात, त्यांचा वापर करावा. आपली उपकरणं कधीही बंद बॅगमध्ये ठेवू नये. धुळीपासून जपावे. नियमितपणे त्यांची स्वच्छता ठेवावी. दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी कुणाच्याही हाती आपलं उपकरण न देता ऑथोरोइज्ड सेंटरमध्येच द्यावे.
अर्थातच, आवड आणि बजेट यांची योग्य सांगड घालावी. उपकरणं खरेदी करताना नामांकित कंपन्यांच्या वेबसाईटवर प्रत्येक कॅमेरा लेन्सचे सखोल विश्लेषण असते ते काळजीपूर्वक वाचावे.
आणि मग काय? गेट रेडी, अँड क्लिक क्लिक.....
Happy clicking on wildlife day ..


लेखिका-ऋता कळमणकार

सबस्क्राईब करा

* indicates required