computer

पाण्याच्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटलीचं बूड वेगळं का असतं??

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या रोजच्या गोष्टींमागे मोठं विज्ञान लपलेलं असतं हे आपल्याला सहसा लक्षात येत नाही. पैजेवर सांगतो, आज आम्ही जे वैज्ञानिक तथ्य सांगणार आहोत त्याबद्दलही तुम्ही कधीच विचार केला नसेल.

तर, प्लास्टिक बॉटल्स !! आपल्या सगळ्यांच्याच घरात प्लास्टिकच्या बाटल्या असतात. तुम्ही कधी या बाटल्यांच्या तळाला निरखून पाहिलंय का? प्रत्येक बाटलीच्या खालचा भाग हा वेगळा असतो. उदाहरण म्हणून पाण्याची बॉटल आणि सॉफ्ट ड्रिंकची (कोकाकोला, थम्सअप, वगैरे ) बॉटल घ्या.

बहुतेक पाण्याच्या बाटल्यांचा बुडाचा भाग हा सपाट असतो. वलय असलेली डिझाईन असलीच तर ती फारशी उठावदार नसते. याविरुद्ध सोडा बॉटल, कोकाकोला, थम्सअपच्या बाटल्यांचा तळाचा भाग हा नेहमीच उठावदार असतो.

आता या मागे मोठं विज्ञान लपलंय याचा आपण कोणीच विचार केला नसेल. हा डिझाईनचा भाग आहे असंच आपण समजत आलोय, पण त्या मागे विज्ञान आहे. चला तर समजून घेऊया.

सॉफ्ट ड्रिंकसाठी लागणाऱ्या बाटल्या या नेहमी फ्रीजर मध्ये असतात, कारण सॉफ्ट ड्रिंक हे नेहमीच थंड प्यायलं जातं. आता विज्ञान असं म्हणतं की जेव्हा द्रव पदार्थ थंड होतो तेव्हा त्याचा आकारमान वाढतो. म्हणून बाटली डीप फ्रीज मध्ये ठेवताना ती पूर्ण भरलेली नसावी याची काळजी घेतली जाते.

आता सॉफ्ट ड्रिंकच्या बाबतीत बॉटल सतत फ्रीजर मध्ये ठेवावी लागत असल्याने बाटलीला तडे जाण्याची शक्यता असते. हे होऊ नये म्हणून बाटलीच्या तळाच्या भागात ५ उठावदार वलय असतात. जेव्हा आतील सॉफ्ट ड्रिंकचं आकारमान वाढतं तेव्हा हेच डिझाईन दबाव सहन करण्याचं काम करतं. वेळ पडल्यावर बाटलीच्या तळाचा भाग प्रसरण पावतो जेणेकरून बाटली फुटणार नाही.

सोप्प्या शब्दात बाटलीचं प्रेशर सहन करण्यासाठी या डिझाईनची व्यवस्था केलेली असते. हे प्रेशर आतील सॉफ्ट ड्रिंकचं तर असतंच पण आत असणाऱ्या हवेचं पण असतं. तुम्हाला तर माहित असेलच कोकाकोला पिताना आपण बाटली उघडी ठेवत नाही, कारण आतील ‘गॅस’ उडून जाऊ नये. बाटली जेव्हा सॉफ्ट ड्रिंकने भरली जात असते त्यावेळी हा ‘गॅस’ प्रचंड दाबाने आत भरला जातो. बाटलीला या ‘गॅस’चं पण पण प्रेशर सहन करावं लागतं.

याचा दुसरा फायदा असा, की जेव्हा आपण चुकून बाटली पाडतो तेव्हा ती फुटत नाही. कारण अर्थातच दबाव सहन करण्याची क्षमता !!

पाण्याची बाटली याच्या अगदी विरुद्ध असते. पाण्याच्या बाटलीला एवढा दबाव सहन करण्याची आवश्यकता नसल्याने त्याचं डिझाईन हे साधं सोप्पं असतं.

तर मंडळी, आपण आजवर ज्या सोड्याच्या बाटलीला गृहीत धरत होतो त्या मागे एवढी इंजिनियरिंग आणि विज्ञान आहे. याचा कधी विचार केलेला का ?

 

आणखी वाचा :

प्लास्टिकच्या बाटल्या सोडा, वापरा आता या नव्या इकोफ्रेंडली बांबूच्या बाटल्या..

बिसलेरीची बाटली पुन्हा पुन्हा वापरू नये? काय आहे कारण ?

पाण्याच्या बाटलीऐवजी चक्क पाण्याचे गोळे ? काय प्रकरण आहे हे ??

सबस्क्राईब करा

* indicates required