जगातलया पहिल्या कम्प्युटर प्रोग्रामर्स महिला होत्या, पण मग नंतर हे क्षेत्र पुरूषप्रधान कसं काय झालं?

लेडी लव्हलेस(१० डिसेंबर, १८१५-२७ नोव्हेंबर, १८५२)हिला जगातली पहिली प्रोग्रामर मानलं जातं. तिनं त्या काळी चार्लस बॅबेजच्या मशीनवर काम केलं आणि तिच्या लक्षात आलं की फक्त आकडेमोड करण्याव्यतिरिक्तही अनेक कामं संगणकाकडून करून घेता येतील. त्यासाठी तिनं जगातला पहिला अल्गोरिदम लिहिला. अशा तऱ्हेनं जगातल्या पहिल्या प्रोग्रॅमचा जन्म झाला होता.

(लेडी लव्हलेस - स्रोत)

तोवर हे संगणक बरेचसे यांत्रिक म्हणजेच  मेकॅनिकल होते.यांचा आकार अवाढव्य तर होताच, पण प्रोसेसिंगलाही खूप वेळ लागे.   पुढं इलेक्ट्रॉनिक जगतात क्रांती झाल्यावर संगणकांचा आकार आधीच्या मानाने लहान झाला आणि त्यातून आऊटपुट पण लवकर मिळू लागले. या पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल कंप्युटरचं नांव होतं इनिॲक(ENIAC). यावर काम करणाऱ्या पहिल्या काही माहिलांमध्ये जीन जेनिंग्ज बार्टिक(Jean Jennings Bartik) यांचा समावेश होता. 

कोण होत्या या जीन जेनिंग्ज बार्टिक?

जीन बार्टिक यांचं गणित चांगलं होतं. पूर्वी त्या किती लोकांनी मिसाईल कितपत आणि कोणत्या अंशांत उचललं आहे, यावरून ते कुठे जाऊन कोसळेल याच्या विक्षेपमार्ग(trajectory)ची गणितं करायच्या. त्यांची उत्तरं अचूक येत. पण या आकडेमोडीत इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागे की उत्तर शोधून त्यांचा ताळा पाहायला बराच वेळ लागे. त्यामुळं जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीन बार्टिकना इनिॲकवर काम करायची संधी मिळाली, तेव्हा त्या आनंदाने तयार झाल्या. 

त्या काळी संगणक बनवणं हे अधिक बौद्धिक आणि शारीरीक श्रमाचं काम समजलं जाई. प्रोग्रॅमिंग करणं हे बायकी, कमी कष्टाचं आणि कारकुनी काम मानलं जाई. त्यामुळं संगणकावर  प्रोग्रॅमिंग करणं हे काम बायकांकडे आलं. अर्थातच,  या जीन आणि त्यांच्या टीमनं इनिॲकवर चालणारे आणि मिसाईल सोडल्यावर कुठे पडेल याची अचूक गणितं करणारे प्रोग्रॅम्स लिहिले. साहजिक आहे,  माणसांपेक्षा संगणकाचा वेग निश्चितच जास्त होता. 

या इनिॲक मशीनची पण एक गंमत झाली. ज्यादिवशी इनिॲक काय करू शकतो, हे पब्लिकला दाखवायची वेळ आली, त्याच्या आदल्या रात्रीच तो नीट चालेनासा झाला.  जीन आणि त्यांची सहकारी बेट्टी स्नायडर (Betty Snyder) यांनी त्याला दुरूस्त केलं. प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी इनिॲकनं मिसाईल सोडल्यावर कुठे पडेल याचं गणित अवघ्या २० सेकंदांत सोडवलं. आणि त्या काळात मिसाईल त्याच्या टारगेटवर जाऊन आदळायला ३० सेकंद लागत असत. म्हणजे, गणित दहा सेकंद आधीच सुटलं होतं. लोकांना हा नवा संगणक खूपच आवडला. पण.. बार्टिक आणि स्नायडर यांची ना नावं पेपरात आली, ना फोटो!! त्यानंतर झालेल्या सेलेब्रेशन पार्टीचं आमंत्रणही त्यांना नव्हतं. 

( फोटो डावीकडून जीन आनी फ्रान बिलास इनिॲक वर काम करताना. तेव्हा केबल्स स्विचेसमध्ये घालून किंवा काढून/ ॲडजस्ट करून प्रोग्रॅमिंग केले जाई - स्रोत)

युद्ध संपल्यानंतर बार्टिक आणि इनिॲकवर काम करणाऱ्या इतर सहाजणी युनिवॅक(UNIVAC) वर काम करू लागल्या. तिथंच त्यांची भेट नेव्हीच्या रिझव्हिस्ट ग्रेस हॉपर यांच्याशी झाली.

ग्रेस हॉपर यांचं संगणक क्षेत्रातलं योगदान-
ग्रेस हॉपर या संगणकाला सोप्या पद्धतीनं आज्ञावली (instructions) कशी देता येईल यावर काम करत होत्या. कारण तोपर्यंत कंप्युटरला इनपुट देणं मोठं कठीण काम होतं. कार्डांवर instructions चे सांकेतिक नंबर पंच केले जायचे, ही पंच केलेली कार्डे वेगळ्याच यंत्राकडून वाचली जायची. मग पुढची आकडेमोड होत असे!!  आजच्यासारखे थेट घेतला कीबोर्ड आणि बडवला प्रोग्रॅम असा प्रकार नव्हता. तेव्हा ग्रेस हॉपर या बाईंनी १९५९मध्ये संगणक आज्ञावलीची एक भाषा शोधली. त्या भाषेला आज वापरल्या जाणाऱ्या 'कोबोल'ची आजी म्हटलं जातं. ग्रेसच्या भाषेवर आधारित असलेली कोबोल आजही बऱ्याचशा बँका आणि कंपन्यांमधून वापरली जाते. या भाषेची खासियत अशी की इथं अंक वापरण्यापेक्षा थेट इंग्रजीतून कमांड्स(instructions)  देता येत होत्या. डिजिटल संगणक क्षेत्रात ही मोठीच क्रांती होती. 

( ग्रेस हॉपर- स्रोत)

असं म्हणतात की १९५०च्या दरम्यान ३०% ते ५०% प्रोग्रॅमर्स या स्त्रिया असत. 

पण मग या क्षेत्रात पुरूषांची मक्तेदारी कशी निर्माण झाली?
हा काळ येईपर्यंत प्रोग्रॅमिंग करणं हे अधिकाधिक बौद्धिक काम समजलं जाऊ लागलं होतं. त्यातली कारकुनी कामाची मानहानीकारक संकल्पना नष्ट झाली होती.   नोकरीच्या वेगवेगळ्या संधी तयार झाल्या होत्या. तिथं पगारही भरपूर मिळू लागले होते. अचानकपणे या व्यवसायाला ग्लॅमर प्राप्त झालं होतं आणि त्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती. मग काय, स्त्रिया फक्त गॉसिप करणाऱ्या, बिनकामाच्या, नुसता वेळकाढूपणा करणाऱ्या अशी त्यांची इमेज तयार झाली. पुरूषांनी प्रोफेशनल संस्था स्थापन केल्या, स्त्रियांना या क्षेत्रात येणं अवघड केलं गेलं, आणि स्त्रियांना प्रोग्रॅमरच्या नोकरीवर ठेवणं प्रतिकूल मानलं जाऊ लागलं.   नोकरीच्या मुलाखतीसाठी पुरूषांच्या कलाचे बुद्धीमत्ता चाचणी आणि व्यक्तिमत्वाचे  प्रश्न विचारले जाऊ लागले आणि पुरूषांच्या ग्रुपमध्ये अशा प्रश्नांची उत्तरं एकमेकांसोबत शेअर केली जाऊ लागली. 

( सिलिकॉन व्हॅली-   स्रोत)

या काळात यशस्वी पुरूष प्रोग्रॅमर्स हे अतिहुशार (नर्ड किंवा गीक) आणि काहीसे माणूसघाणे अशीही इमेज तयार झाली होती. १९८०मध्ये तर ही इमेज अधिकच स्ट्राँग झाली. तेव्हाचे विअर्ड सायन्स, वॉर गेम्स, आणि रिअल जिनियस अशा सिनेमांनीही या प्रतिमेला खतपाणी घातले.   आजही सिलिकॉन व्हॅलीसारख्या मालिकांमध्येही तेच दाखवलं जात आहे. त्यातच संगणकावर व्हिडिओ गेम्स खेळता येऊ लागल्यावर तर संगणक पुरुष आणि मुलग्यांसाठी आहे अशा जहिराती तयार केल्या जाऊ लागल्या. घरी मुलासाठी संगणक घेणं सहजपणे होत असे पण तितक्याच सहजपणे मुलगीसाठी वेगळा संगणक घेणं ही संकल्पना पालकांच्याही पचनी कमी पडे.

 एका सर्व्हेनुसार २०११ मध्ये संगणक शास्त्र क्षेत्रातल्या स्त्रियांची संख्या फक्त १७% होती. आजच्या घडीला १७% पुरुष स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा गणित या विषयांतली पदवी मिळवतात, तर स्त्रियांच्या बाबतीत ही टक्केवारी फक्त ६.७% आहे. परिस्थिती बदलत आहे असं वाटत आहे, परंतु एकूण लोकसंख्येच्या मानानं हा विचार केला तर ते प्रमाण नगण्य आहे हेच या सर्व्हेतून दिसून येत आहे. 

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा