computer

अवघ्या १४ वर्षांच्या बुद्धिबळपटूने दुसऱ्यांदा भारताची मान उंचावली...कोणती कामगिरी केली आहे पाहा !!

१४ वर्ष वय म्हणजे खेळण्या- बागडण्याचे वय. पण याच वयात अनेकांनी इतिहास घडवला आहे राव!! आपला मास्टर ब्लास्टर सचिनसुद्धा १४ वर्ष वयाचा असताना स्थानिक क्रिकेटमध्ये रेकॉर्डसवर रेकॉर्डस करत होता. सध्या असाच एक १४ वर्षाचा गडी जागतिक स्तरावर धुमाकूळ घालतोय. आर. प्रज्ञानंद असे त्याचे नाव!! अवघ्या १४ वर्षाच्या वयात त्याच्या नावावर बुद्धिबळातील अनेक रेकॉर्डस् आहेत.

नुकत्याच झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने अंडर १८ ओपन श्रेणीतील गोल्ड मेडल स्वतःच्या नावावर केले. मंडळी, आर. प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात कमी वयाचा आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचा कमी वयाचा ग्रँडमास्टर आहे. 

१२ वर्षांचा असताना हा पठ्ठ्या ग्रँडमास्टर बनला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एकामागून एक असे अनेक विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केले आहेत. याआधी इटलीत झालेल्या ग्रेनडाईन ओपनच्या फायनलमध्ये तो पोचला होता, पण थोडक्यात त्याचे गोल्ड हुकले होते. आता ती  कमतरता भरून काढत त्याने गोल्ड मेडलवर स्वतःचे नाव कोरले आहे. या स्पर्धेतील फायनलची लढत मोठी रंजक झाली राव!! जर्मनीचा वालेन्टीन बकल्स ही मॅच ड्रॉ करण्यात यशस्वी झाला, पण आधीच्या गुणांच्या जोरावर त्याने गोल्ड मेडल आपल्या नावावर केले.

मग, काय वाटतं तुम्हांला या वंडरबॉयबद्दल? विश्वनाथन आनंद याची बुद्धिबळातली कामगिरी जगभर प्रसिद्ध आहे, त्याचा वारसा हा मुलगा चालवणार हे नक्की!!

 

लेखक : वैभव पाटील.

 

आणखी वाचा :

विश्वनाथन आनंद नंतर कोण ? अहो, आर. प्रज्ञानंद !! हा आहे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण 'ग्रॅण्डमास्टर' !!