अँडरसनचे स्विंग होणारे चेंडू ते खराब फॉर्म; इंग्लंडमध्ये विराट कोहली समोर असतील ही ५ मोठी आव्हानं..

भारत - दक्षिण आफ्रिका टी -२० मालिका (India vs South Africa)  बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघासमोर इंग्लंड संघाचं आव्हान असणार आहे. गतवर्षी झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) आक्रमक भूमिकेसमोर इंग्लिश खेळाडू नतमस्तक होताना दिसून आले होते. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. केवळ एक विजय किंवा सामना ड्रॉ करताच भारतीय संघ इतिहास रचणार आहे. मात्र भारतीय संघाला जर हा विजय मिळवायचा असेल तर माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चालणं खूप गरजेचं आहे. विराट या संघातील मुख्य फलंदाज आहे, इंग्लिश गोलंदाज देखील विराटला टार्गेट करणार यात काहीच शंका नाही. १-५ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या या सामन्यात विराट कोहलीसमोर कुठली आव्हानं असणार आहे , याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

१) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक :

३३ वर्षीय विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रनमशीन म्हणतात. तब्बल ७० शतकांचा डोंगर उभारणाऱ्या विराट कोहलीला गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी करता आली नाहीये. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या कसोटी सामन्यात त्याने १३६ धावांची खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर त्याने ७३ डावात ३७.५६ च्या सरासरीने २४७८ धावा केल्या. तर २४ अर्धशतक झळकावले, मात्र एकही शतक साजरं करता आलं नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यात विराट कोहली शतक झळकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

२) जेम्स अँडरसन विरुद्ध विराट कोहली :

जेम्स अँडरसन (James Anderson) विरुद्ध विराट कोहली हे समीकरण काही नवीन नाहीये. जेव्हा जेव्हा हे दिग्गज खेळाडू आमने सामने येतात तेव्हा प्रेक्षकांना रोमांचक लढत पाहायला मिळते. हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूंवर विराट कोहली क्लासिकल चौकार मारतो. तर अँडरसन त्याची विकेट देखील काढत असतो. २०१२ मध्ये १ वेळेस, २०१४ मध्ये ४ वेळेस त्याने विराट कोहलीला बाद केलं होतं. तर २०१६ आणि २०१८ मध्ये तो एकदा ही बाद झाला नाही. तर गतवर्षी झालेल्या मालिकेत पुन्हा एकदा अँडरसनने विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एकमात्र कसोटी सामन्यात हे दोघेही खेळाडू शेवटच्या वेळी आमने सामने येऊ शकतात.

) ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू :

गेल्या दोन तीन वर्षात गोलंदाजांना विराट कोहलीला बाद करण्याचा फॉर्म्युला माहीत झाला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाका आणि विराट कोहलीची मौल्यवान विकेट मिळवा. कव्हर ड्राईव्ह हा विराट कोहलीचा आवडता शॉट आहे. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. हाच शॉट त्याचं बाद होण्याचं कारण ठरत आहे. गेल्या दोन तीन वर्षांत तो अनेकदा कव्हर ड्राईव्ह खेळताना बाद झाला आहे.

) चांगली फलंदाजी करण्याचा दबाव :

विराट कोहली आता नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान परदेशात तो पहिल्यांदाच कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगली फलंदाजी करण्याचा दबाव असणार आहे. कारण एका फलंदाजाने जर चांगली कामगिरी केली नाहीतर त्याला संघातील स्थान गमवावं लागू शकतं. हे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सोबत देखील घडलं आहे. त्यामुळे विराट कोहलीवर अतिरिक्त दबाव असेल यात काहीच शंका नाही.

) आयपीएल स्पर्धेत ठरलाय फ्लॉप :

विराट कोहली आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ( Royal challengers Bangalore) संघासाठी खेळताना त्याने १६ सामन्यांमध्ये २२.७३ च्या सरासरीने अवघ्या ३४१ धावा केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे या हंगामात तो ३ वेळेस गोल्डन डकवर बाद झाला आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरू व्हायला १० दिवस शिल्लक आहेत. या दिवसात त्याला जोरदार तयारी करावी लागणार आहे.

काय वाटतं? इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहली शतक झळकावेल का? कमेंट करून नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required