एकही चेंडू न टाकता विकेट अन् मोडलाय सचिनचा विक्रम!! पाहा विराटचे कोणालाही मोडता न येणारे ५ विक्रम..

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, क्षेत्ररक्षण असो किंवा नेतृत्व, या सर्व जबाबदाऱ्या तो योग्यरित्या पार पाडत असतो. फलंदाजी करताना त्याच्या फलंदाजीचा टायमिंग आणि क्लास इतका परफेक्ट असतो की, गोलंदाज देखील तो शॉट पाहून कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ शतकं झळकावणाऱ्या विराटला गेल्या काही महिन्यांपासून एकही शतक झळकवता आलं नाहीये. मात्र त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक असे विक्रम केले आहेत, जे कुठल्याही क्रिकेटपटूसाठी केवळ एक स्वप्नंच असू शकतं.

१) एकही चेंडू न टाकता विकेट:

विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेतला आहे. आता तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की, असं होऊच शकत नाही. मात्र २०११ मध्ये झालेल्या टी -२० सामन्यात विराट कोहलीने हा पराक्रम केला होता. तर झाले असे की, २०११ मध्ये इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये टी -२० सामना सुरू होता. त्यावेळी केविन पीटरसन टीच्चून फलंदाजी करत होता. त्याला बाद करण्यासाठी एमएस धोनीने  शक्कल लढवली आणि चेंडू विराट कोहलीकडे सोपवला. विराट कोहली गोलंदाजीला येताच पीटरसन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करणार हे एमएस धोनीला माहीत होतं. त्यामुळे त्याने विराट कोहलीला वाईड चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. विराटने वाईड चेंडू टाकला आणि केविन पीटरसन यष्टीचीत झाला. यासह तो एकही चेंडू न टाकता विकेट बाद करणारा गोलंदाज ठरला. (virat kohli's records)

२) आयपीएलच्या एका हंगामात ९७३ धावा :

विराट कोहली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाला आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकता आली नाहीये. मात्र विराट कोहलीने या संघासाठी खूप काही केलं आहे. २०१६ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात विराट कोहलीचे रौद्र रूप पाहायला मिळाले होते. त्याने या हंगामात ८१.०८ च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत जोस बटलरला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र तो ९०० धावांचा आकडा देखील पूर्ण करू शकला नाही.

३) वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं :

विराट कोहलीला भारतीय संघाची रनमशीन देखील म्हटलं जातं. कारण त्याने भारतीय संघासाठी अनेकदा महत्वपूर्ण खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४३ शतकं झळकावली आहेत. यादरम्यान ३६ वेळेस भारतीय संघाने विजय मिळवला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही फलंदाजाला तोडता आला नाहीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

४) वनडेमध्ये सर्वात जलद १० हजार धावा :

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये सरस आहे. मात्र वनडेमध्ये त्याची बॅट आग उकळते. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने सर्व प्रथम वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठला होता. सचिन तेंडुलकरने २५९ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. तर विराट कोजलीने केवळ २०५ डावांमध्ये १० हजार धावांचा डोंगर सर केला होता.

५) कसोटी क्रिकेटमध्ये ७ दुहेरी शतकं :

विराट कोहलीने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात अप्रतिम फलंदाजी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कर्णधार म्हणून ७ दुहेरी शतकं झळकावली आहेत. यासह तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७ वेळेस दुहेरी शतक शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत ५ दुहेरी शतकांसह ब्रायन लारा दुसऱ्या स्थानी आहे.

काय वाटतं? विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १०० शतकं झळकावण्याचा विक्रम मोडून काढू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required