अवघ्या ३१ चेंडूमध्ये शतक करण्याचा विक्रम करणारा एबी डिव्हीलीयर्स क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त !
एबी डिव्हीलीयर्स हा दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा बॅट्समन आता क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला आहे. ट्विट करून त्याने अधिकृतरित्या ही घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत कमी आणि भारतात तो अधिक लोकप्रिय होता. कोहलीसोबत त्याच्या बॅटिंग स्टाईलची नेहमी तुलना होते नेमके कोण अधिक कसलेला बॅट्समन आहे यावरही खच्चून वाद होतात.
पण आता सर्वांचा लाडका एबीडी काय मैदानावर दिसणार नाही.आयपीएलमधूनही त्याने निवृत्ती घेतली आहे.
२००४ साली कसोटी, २००५ साली वनडे आणि २००६ साली T20 सामन्यांमध्ये त्याने पदार्पण केले.तेव्हापासून आजतागायत आपल्या तुफान बॅटिंग आणि भन्नाट विकेटकीपिंगने तो लोकांचे मन जिंकत होता. अवघ्या ३१ बॉलमध्ये शतक आणि सर्वात वेगवान ५० आणि १५० धावा करण्याचा विक्रम तो राखून आहे यावरून त्याचा धावा घेण्याचा वेग लक्षात येऊ शकतो.
एकाचवेळी तो दक्षिण आफ्रिकेचा तिन्ही प्रकारातील क्रिकेटचा कॅप्टन होता.पण त्याच्यामागे दुखापती लागल्या आणि तो बेजार झाला. एबीडी आता निवृत्त झाला आहे आणि त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दलही बरेच लिहून आले आहे. मात्र तो इतरही अनेक क्षेत्रात किती पारंगत होता याची झलक आजच्या लेखात तुम्हाला दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ज्युनिअर एथलिट स्पर्धेत तो सर्वाधिक वेगाने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला होता. हा पठ्ठया रॉकस्टारही आहे. त्याने काही अल्बम रिलीज केले आहेत, ज्यात तो संगीतात पण उत्तम आहे हे सिद्ध होते. 'शो व्हु यु आर' हा असाच एक अल्बम आहे.
दक्षिण आफ्रिका ज्युनिअर रग्बी संघाचा हा भाऊ कधीकाळी कॅप्टन होता. इतके कमी की काय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी त्याची निवड राष्ट्रीय हॉकी संघात झाली होती. इतक्या सगळ्या खेळात प्रतिभा मिळवणे सोपे काम नाही. आता हा भाऊ इतक्यावरच थांबलेला नाही.
ज्युनिअर नॅशनल फुटबॉल संघाचा देखील तो भाग होता. ज्युनिअर डेव्हीस कपसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व एबीडीने केले आहे. शाळेत असताना स्विमिंगमध्ये त्याने सहा पदके नावावर केली आहेत. बॅटमिंटन खेळात त्याने अंडर १९ नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली आहे.
आता हा फक्त खेळात टॉपर होता अशातलाही भाग नाही बरंका. शाळेत असताना त्याने तेथील तेव्हाचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या हस्ते विज्ञान प्रकल्पासाठी सुवर्णपदक प्राप्त केले होते.हे सगळे बघून या भावाबद्दल एकच गोष्ट सांगता येईल ती म्हणजे 'ऐसा कोई खेल नई जो भाईने खेला नई'
उदय पाटील




