IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधारांना भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाहीये,यादीत अनेक दिग्गजांचा समावेश..

सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर सुरू आहे. हा सामना झाल्यानंतर मालिकेतील अंतिम सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. त्यामुळे स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे, ऑस्ट्रेलियाच्या ४ दिग्गज कर्णधारांना भारतात येऊन एकही कसोटी सामना जिंकता आला नाहीये. कोण आहेत ते कर्णधार, चला पाहूया.

एलन बॉर्डर :

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एलन बॉर्डर हे दिग्गज कर्णधारांपैकी एक कर्णधार आहेत. मात्र त्यांना भारतात येऊन एकही कसोटी सामना जिंकता आला नाहीये. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने अनेक मोठ मोठे विजय मिळवले. मात्र गोष्ट जेव्हा भारतात नेतृत्व करण्याची आली, त्यावेळी त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी ९३ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्यांनी ३२ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला.

रिकी पाँटिंग:

रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २ वेळेस विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. तसेच कर्णधार म्हणून तो वनडे आणि कसोटीमध्ये सुपरहिट ठरला आहे. मात्र भारतात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. भारतात त्याने नेतृत्व करताना ७ कसोटी सामने खेळले. ज्यात त्याला ५ सामने गमवावे लागले. तर २ सामने अनिर्णीत राहिले.

मायकल क्लार्क:

रिकी पाँटिंगनंतर मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियाची जबाबदारी सांभाळली. त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केलं. तसं पाहायला गेलं तर कर्णधार म्हणून क्लार्कने अप्रतिम कामगिरी केली. मात्र भारतात त्याला ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून देता आला नाही. ४७ कसोटी सामन्यांपैकी २४ सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मात्र भारतात एकही विजय मिळवला नव्हता.

पॅट कमिंस:

भारतीय संघाविरूध्द सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिंसकडे देण्यात आली होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून तो बाहेर झाला आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून देता आला नव्हता.

मात्र स्टीव्ह स्मिथकडे भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना जिंकून हा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required