computer

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जवळ येतेय. तिच्याबद्दल या ५ रंजक गोष्टी माहित आहेत??

टेनिस चाहत्यांसाठी पर्वणी असणारी ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन येत्या १७ जानेवारीपासून मेलबर्न पार्क येथे सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची ही ११० वी स्पर्धा टेनिस चाहत्यांची प्रतीक्षा संपवून दिमाखात सुरू होत आहे. गेल्यावेळी नोव्हाक जोकोविच विजेता ठरला होता. यंदा तो वेगळ्याच कारणांनी चर्चेत असला तरी यंदा पुन्हा तो विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. तर महिलांमध्ये नाओमी ओसाका ही गेल्यावेळची चॅम्पियन यावेळी पुन्हा मेहनत आजमावणार आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन ही दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केली जाते. त्याअर्थाने ही वर्षातील पहिलीच ग्रँड स्लॅम असते. यानंतर फ्रेंच, विम्बल्डन, यूएस ओपन होतात. टेनिसच्या या सोहळ्यात मेन्स सिंगल्स, वुमन्स सिंगल्स आणि मिक्स डबल्स असे प्रकार खेळवले जातात, हे एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. हार्ड कोर्टसवर बाहेरील बाजूस हे सामने होतात. आज पाहूया या स्पर्धेबद्दलची काही रंजक आणि सुरस माहिती!!

१. १९०५ साली जेव्हा ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप नावाने ही स्पर्धा भरवली गेली तेव्हा ही स्पर्धा क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. १९२४ पर्यंत तर ही स्पर्धा महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखलीच जात नसे. १९२७ साली स्पर्धेचे नामकरण ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप म्हणून करण्यात आले, तर ऑस्ट्रेलियन ओपन म्हणून ओळखली जायला या स्पर्धेला १९६९ पाहावे लागले.

२. ही स्पर्धा कितीही जुनी वाटत असली तरी इतर स्पर्धांच्या मानाने ही स्पर्धेत नवीच म्हणावी लागेल. कारण विम्बल्डन १८७७ सालापासून चॅम्पियनशिप म्हणून सुरू आहे. विम्बल्डन ही सर्वात जुनी स्पर्धा आहे, तर यूएस ओपन १८८१ आणि फ्रेंच ओपन १८९१ साली सुरू करण्यात आली होती.

३. ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात नजर फिरवली तर ऑस्ट्रेलियाचाच केन रोझवेल हा १९५३ साली सर्वात तरुण विजेता ठरला होता. त्यावेळी त्याचे वय फक्त १८ वर्षं २ महिने होते. मार्विन रोझ याला त्याने फायनलमध्ये हरवले होते. विशेष म्हणजे हाच रोझवेल सर्वाधिक वयाचा विजेता देखील ठरला होता. त्यावेळी त्याचे वय ३७ वर्षं आणि २ महिने होते. त्यावेळी त्याने माल्कम अंडरसनला १९७२ साली हरवले होते.

४. ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील सर्वाधिक रंजक सामना २०१२ साली ठरला होता. या सामन्यात जोकोविच आणि नदाल समोरासमोर उभे ठाकले होते. तब्बल ५ तास ५३ मिनिट चाललेला हा सामना ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेला सामना म्हणून ओळखला जातो. यावेळी जोकोविचने तिसऱ्यांदा ही स्पर्धा स्वतःच्या नावे केली होती.

५. या स्पर्धतील विजेत्यांना दिले जाणारे चषक हे काही महान खेळाडूंच्या नावे दिले जातात. मेन्स सिंगल्समधील विजेत्याला महान ऑस्ट्रेलियन खेळाडू नॉर्मन ब्रूक्स यांच्या नावे कप दिला जातो. नॉर्मन यांनी १९११ साली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते तर १९०७ आणि १९१४ साली विम्बल्डन जिंकले होते.

तर वुमन्स सिंगल्स चॅम्पियनला डाफने अखुर्ट्स यांच्या नावाने चषक दिले जाते. डाफने यांनी ५ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून दाखवले होते.

तुम्हाला या स्पर्धेबद्दल अशाच काही रोचक गोष्टी माहित असतील तर कमेंटबॉक्स आपलाच आहे!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required