computer

१८व्या वर्षी यूएस ओपन चॅम्पियनशिप जिंकून ग्रँड स्लॅम जिंकणारी ही पहिली ब्रिटिश खेळाडू- एमा रडुकानू!!

टेनिसमध्ये यूएस ओपन चॅम्पियनशिप जिंकून ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू बघत असतो. ही एक मानाची स्पर्धा मानली जाते. या वर्षीच्या स्पर्धेत ब्रिटनच्या १८ वर्षीय एमा रडुकानूने यूएस ओपन चॅम्पियन बनून इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे. ४४ वर्षांत ग्रँड स्लॅम जिंकणारी ही पहिली ब्रिटिश महिला खेळाडू आहे. त्याचसोबत एमा गेल्या ५३ वर्षांत यूएस ओपन जिंकणारी तिच्या देशातली पहिली खेळाडू आहे. अवघ्या 18व्या वर्षी एमाने ही कामगिरी केल्याने तिचे कौतुक जगभरात होत आहे. एमाचा हा प्रवास कसा होता, याबद्दल माहिती करून घेऊयात.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी नॉटिंगहॅममध्ये टूर लेव्हलमध्ये पदार्पण करणाऱ्या एमाने कल्पनाच केली नव्हती की ती हे जेतेपद पटकावेल. जागतिक क्रमवारीत १५०व्या क्रमांकावर असलेल्या एमाने १ तास ५१ मिनिटे चाललेल्या सामन्यात कॅनडाच्या १९ वर्षीय लैला फर्नांडिसचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजय मिळवला.
गेल्या २२ वर्षांत प्रथमच इतक्या लहान वयाच्या खेळाडूंमध्ये ग्रँड स्लॅम फायनल खेळली गेली. याआधी १९९९ मध्ये यूएस ओपनमध्येच १७ वर्षांच्या सेरेनाने १८ वर्षे वयाच्या मार्टिना हिंगीसचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. जुलै महिन्यात एमाने विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. परंतु तिला श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे सामना सोडावा लागला होता. पण तिने पुनरागमन केले आणि त्यातही ग्रँडस्लॅम जिंकून मोठे यश मिळवले.

एमाचा जन्म टोरंटो येथे झाला आहे. तिची आई रिनी चीनची आहे आणि वडील इयान रोमेनियन आहेत. एमा दोन वर्षांची असताना हे कुटुंब कॅनडामधून यूकेमध्ये गेले आणि दक्षिण पूर्व लंडनच्या ब्रोमली येथे गेले. तिने वयाच्या १० व्या वर्षी ब्रॉमली टेनिस सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरू केले तेव्हा ती टेनिस शिकणारी एकमेव मुलगी होती. तिने खूप जिद्दीने आणि चिकटीने टेनिसचे प्रशिक्षण पूर्ण केले. यासाठी तिला आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले. गंमत म्हणजे एमा जिंकल्यावर ब्रिटन आणि चीन या दोन्ही देशात आनंद साजरा केला गेला. कारण तिची आई चीनची आहे. टेनिसशिवाय एमाला मोटरस्पोर्ट्स, गो कार्टिंग, घोडेस्वारी देखील आवडते. ती अभ्यासात ही हुशार आहे. सराव करताना मध्येच ब्रेक घेऊन अभ्यास पूर्ण करायची.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सामना पहिला आणि एमाचे विशेष कौतुक केले. "ब्रिटिश टेनिससाठी एक नवा स्टार जन्माला आला आहे" अशा शब्दांत राणी एलिझाबेथ द्वितीयकडून ही एमाला खास शाबासकी मिळाली आहे. एमासाठी ही खुप मोठी गोष्ट आहे. ती यामुळे खूप आनंदात आहे. इतक्या लहान वयात ही एक उल्लेखनीय कामगिरी केल्याने जगभरातील वृत्तपत्रात तिचे कौतुक झाले आहे. तिची मेहनत आणि कौशल्य बघून अनेकांनी ती भविष्यात खूप मोठी खेळाडू बनेल याची खात्री दिली आहे.

टेनिसमध्ये एमा नावाचा एक नवा स्टार जन्माला आला आहे असे म्हणायला हरकत नाही. एमाचे खूप खूप अभिनंदन!!

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required