भारत - न्यूझीलंड सामन्यात घडली होती थरारक घटना! पॅव्हेलियनची भिंत कोसळली तरी देखील सुरू राहिला होता सामना..

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका समाप्त झाली असून, आता वनडे मालिका सुरू झाली आहे. आता योगायोग असा की, २७ वर्षांपूर्वी देखील हे दोन्ही संघ याच दिवशी आमने सामने आले होते. १९९५ मध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका पार पडली होती. या मालिकेतील पाचवा सामना २६ नोव्हेंबर रोजी पार पडला होता. या सामन्यात नॅथन एस्टलने अप्रतिम खेळी केली होती. मात्र या सामन्यात असा काही प्रकार घडला होता,ज्याची आठवण येताच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

आजपासून २७ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ नोव्हेंबर १९९५ रोजी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यातील पहिल्या डावात तर नॅथन एस्टलच्या तुफान फटकेबाजीचा नजारा पाहायला मिळाला. मात्र सामन्याचा दुसरा टप्पा सुरू होताच एक धक्कादायक घटना घडली.

भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू..

१९९६ विश्वचषक स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम बनवण्याचे काम जोरदार सुरू होते. त्यामुळे ईस्ट पॅव्हेलियन जवळ भिंत बांधली गेली होती. तसेच हा रोमांचक सामना पाहण्यासाठी प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची फलंदाजी झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टीयरवर बसलेले प्रेक्षक ब्रेकसाठी बाहेर पडत होते. त्यावेळी ही भिंत कोसळली आणि त्याखाली अनेक प्रेक्षक दाबले गेले होते.

या हृदयद्रावक घटनेत, ३ प्रेक्षकांनी जागीच तर ६ प्रेक्षकांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. तर ६० पेक्षा अधिक लोक या घटनेत गंभीर जखमी झाले होते.

तरीदेखील खेळवला गेला सामना...

ही घटना पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील भयभीत झाले होते. मात्र आयोजकांनी ही बातमी खेळाडूंपर्यंत जाऊ दिली नाही. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला. आयोजकांना भीती होती की, जर सामना रद्द झाला तर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक मैदानात हंगामा करू शकतात.

या घटनेनंतर देखील सामना पूर्ण झाला आणि न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ९९ धावांनी पराभूत केले. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ गडी बाद ३४८ धावा केल्या होत्या. त्यावेळी ही वनडे क्रिकेटच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव ४० षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required