संजू सॅमसन अन् राहुल त्रिपाठीची भारतीय संघात निवड न झाल्याने नेटकरी संतापले, दिल्या अशा प्रतिक्रीया...

येत्या महिन्यात भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) रविवारी (२२ मे) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यासह श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी मिळालेल्या काही खेळाडूंना देखील या संघात संधी देण्यात आली आहे. ज्यात ईशान किशन आणि वेंकटेश अय्यर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

तर आयपीएल २०२२ स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेल्या संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांना या संघात स्थान देण्यात आले नाहीये. याच कारणास्तव सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी मिम्स शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल त्रिपाठीने या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी काही महत्वाच्या खेळ्या केल्या आहेत. त्याने या हंगामातील १३ सामन्यात १६१.७३ च्या स्ट्राइक रेटने ३९३ धावा केल्या आहेत. ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

एका यूजरने ट्विट करत लिहिले की, "ईशान किशनचा गेल्या २ हंगामातील स्ट्राइक रेट हा १२० पेक्षा देखील कमी आहे. तेच राहुल त्रिपाठीने १५० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. दोन यष्टिरक्षकांची निवड करण्यात आली आहे. परंतु राहुल त्रिपाठीचे नाव नाहीये, हे पाहून मला आश्चर्य होत आहे." तसेच संजू सॅमसनने देखील अप्रतिम खेळी करत आपल्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचवले आहे. त्याने अनेकदा आपल्या संघासाठी महत्वाची खेळी केली आहे.

 

 

संजू सॅमसनच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या हंगामात १४ सामन्यात १४७.२४ च्या स्ट्राइक रेटने ३७४ धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर ईशान किशनने १४ सामन्यात १२० स्ट्राइक रेटने ४१८ धावा केल्या आहेत. ईशान किशनला या हंगामात साजेशी कामगिरी करता आली नाही. हेच कारण होते की, मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required