आयुष्यभर अजिंक्य राहिलेले, देशोदेशींच्या पैलवानांना हरवलेले कुस्तीपटू 'द ग्रेट गामा पैलवान'!! जाणून घ्या या थोर पहिलवानाबद्दल!
भारत आणि कुस्ती याचं एक अद्भुत नातं आहे. गामा पैलवानापासून ते आजच्या भोगट भगिनींपर्यंत भारतीय कुस्तीच्या इतिहासात अनेकांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. अलीकडे गुगलने देखील अशाच एका जगज्जेत्या पैलवानाला थेट डूडलद्वारे सलामी दिली. कुस्तीच्या क्षेत्रात आजही ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते असे रुस्तम-ए-हिंद गामा पैलवान यांच्याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
एक काळ होता जेव्हा एखादा माणूस ताकद दाखवू लागला की, लोक त्याला स्वतःला गामा पैलवान समजतो का म्हणायचे!! ताकदीचे समानार्थी नाव म्हणजे गामा पैलवान अशी या पैलवानाची देशात ओळख होती. गामा पैलवान काय उंचीचा माणूस होता हे संपूर्ण जगाने बघितले होते. देशभर कुस्तीचे आखाडे गाजवून गामा पैलवान १९१० साली लंडन गेले होते.
या ठिकाणी त्यांची उंची ५'७ इंच असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे ते जाम भडकले होते. लंडनला त्यांनी आखाड्यात उतरल्यावर थेट आव्हान दिले- "माझ्यासमोर कोणतेही ३ पैलवान यावेत, मी फक्त ३० मिनिटांत त्यांना हरवून दाखवतो".
मात्र गामाचे हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत कुणीच दाखवली नाही. कोणीच पुढे येत नाही असे दिसल्यावर त्यांनी आपल्या पेक्षा जास्त वजनी गटातील पैलवनांना आव्हान दिले. या कुस्तीत आपण हरलो तर जिंकलेली सर्व रक्कम प्रतिस्पर्ध्याला देऊन टाकेल असेही त्यांनी घोषित करून टाकले. अमेरिकेचा पैलवान बेंजामिन रोलर याने गामा पैल्वानाचे हे आव्हान स्वीकारले. या पठ्ठ्याला गामा पैलवानाने दोन मिनिटांत लोळवले.
यानंतर दुसरा पैलवान आला. त्यालाही ९ मिनिटांत हरवले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १२ पैलवांना हरवून ते जगभर दबदबा निर्माण करूनच परतले. भारतात परतल्यावर त्यांना "रुस्तम-ए-हिंद" हा किताब देऊन गौरवण्यात आले.
गामाचा जन्म २२ मे १८७८ अमृतसर जवळच्या जब्बोवाल गावात झाला. गामा पैलवान हे नाव नंतर पडले असले तरी त्यांचे खरे नाव मोहम्मद बक्ष असे होते. गामा अवघ्या १० वर्ष वयाचे होते तेव्हाच आखाड्यात उतरले होते. गामांचे वडील मोहम्मद अझीझ बक्स दतीयाच्या राजाच्या दरबारात कुस्ती खेळत म्हणून गामाला कुस्तीचे संस्कार घरातच मिळाले. गामा ६ वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. वडील गेल्यावर गामांना त्यांचे आजोबा पैलवान नून आणि त्यांचे मामा इदा पैलवान यांनी तालीम दिली.
गामाने देशाचे अवघ्या १० वर्षे वयात लक्ष वेधून घेतले होते. जोधपूरच्या महाराजांनी एक कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. इतक्या कमी वयात गामाने ४०० स्पर्धकांमधून अंतिम १५ मध्ये जागा मिळवली होती. राजाने या वयात गामाचे कर्तृत्व बघूनच त्यांना थेट विजयी घोषित केले होते. त्यानंतर गामाने आयुष्यभर मागे वळून बघितले नाही.
१८९५ साली त्यांचा सामना देशातील सर्वात खतरनाक पैलवान 'रुस्तम-ए-हिंद' रहीम बक्ष सुलतानीवाला यांच्यासोबत झाला. सुलतानीवाला हे गामापेक्षा फूटभर जास्त उंच होते. अटीतटीचा झालेला हा सामना बरोबरीत सुटला तरी सुलतानीवाला यांना घाम फोडणारा पैलवान म्हणून त्यांचे नाव झाले होते. त्यांचा दिनक्रम बघितला तर सामान्य माणसाला चक्कर येईल. रोज दहा तास कुस्तीची प्रॅक्टिस, त्यात ४० पैलवानांसोबत कुस्ती असा रोजचा त्यांचा कार्यक्रम असे.
कुस्ती क्षेत्रात त्याकाळी देशात दबदबा असलेला असा एक पैलवान नव्हता, ज्याला गामा पैलवानांनी चीतपट केले नसेल. इंदूरचे अली बाबा सेन, मुलतानचे हसन बक्ष, गुलाम मोहिनुद्दीन, भोपालचे प्रताप सिंग अशा दिग्गजांना त्यांनी चारीमुंडया चित केले होते. गामा पैलवान यांनी १९१० साली वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप आणि १९२७ साल वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप जिंकत जगात आपल्याला कोणी हरवू शकत नाही हे सिद्ध केले होते.
रोज ५ हजार बैठक आणि ३ हजार दंड मारणे हा त्यांचा नित्यक्रम होता. १०० पोळ्या, १० लिटर दूध, ६ किलो चिकन असा भरमसाठ खुराक करून त्यांनी स्वतःचे शरीर जपले होते. त्यांचे व्यक्तिमत्व इतके भारदस्त आणि वजनदार होते की, समोरच्याला पाहताच धडकी भरेल. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अजिंक्य कुस्तीपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. ब्रूसली सारखे अनेक सेलेब्रिटीनी त्यांच्याकडे आपला आदर्श म्हणून पाहत होते.
देशाची फाळणी झाली त्यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. काही संदर्भांनुसार पाकिस्तान सरकारने त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांची पुरेशी काळजी घेतली नाही तर काही संदर्भांनुसार सरकारने त्यांना जमीन दिली होती आणि अखेर पर्यंत त्यांच्या दवाखान्याचा खर्च उचलला. भारतीय उद्योजक जी. डी. बिर्ला त्यांना महिना ३०० रुपये पेन्शन देत असत.
अखेरच्या काळात त्यांचे शरीर व्याधींनी जर्जर झाले होते अशातच १९६० साली त्यांचा मृत्यू झाला. पण आजही जगभरात त्यांच्या नावाचा डंका वाजत आहे.




