भारत विरुद्ध न्यूझीलंड टी -२० सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडणारे टॉप ५ फलंदाज! यादीत केवळ एक भारतीय फलंदाज...

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये लवकरच टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३ टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना १८ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर मालिकेतील अंतिम सामना २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू जोरदार कामगिरी करताना दिसून येणार आहेत. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील टी -२० सामन्यांमध्ये कुठल्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत याबाबत माहिती देणार आहोत. 

रोहित शर्मा :

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी -२० सामन्यांमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुध्द झालेल्या २० टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ५११ धावा केल्या आहेत. मात्र आगामी टी -२० मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो खेळताना दिसून येणार नाहीये.

कॉलिन मुनरो:

न्यूझीलंड संघातील आक्रमक फलंदाज कॉलिन मुनरो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कॉलिन मुनरोने अनेकदा न्यूझीलंड संघासाठी मोलाची बजावली आहे. भारतीय संघाविरुद्ध फलंदाजी करताना देखील त्याची बॅट चांगलीच तळपते. त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये एकूण ४२६ धावा केल्या आहेत.

मार्टिन गप्टील

मार्टिन गप्टील हा न्यूझीलंड संघातील विश्वासू फलंदाजांपैकी एक आहे. सलामीला येऊन तो न्यूझीलंड संघाला जोरदार सुरुवात करून देत असतो. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी -२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मार्टिन गप्टील तिसऱ्या स्थानी आहे. मार्टिन गप्टीलने एकूण ३८० धावा केल्या आहेत. 

केन विलियमसन:

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन या यादीत चौथ्या स्थानी आहे. केन विलियमसन तीनही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघासाठी धावांचा पाऊस पाडत असतो. त्याने भारतीय संघाविरुद्ध टी -२० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३५८ धावा केल्या आहेत.

रॉस टेलर:

या यादीत शेवटच्या स्थानी आहे, न्यूझीलंड संघातील माजी फलंदाज रॉस टेलर. रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. मात्र त्याने न्यूझीलंड संघासाठी अनेकदा मोलाचे योगदान दिले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी -२० सामन्यांमध्ये रॉस टेलरने एकूण ३४९ धावा केल्या आहेत.

 

या यादीत केवळ एक भारतीय फलंदाज आहे, तो म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा. काय वाटतं कुठला फलंदाज आगामी टी -२० मालिकेत धावांचा पाऊस पाडत या यादीत प्रवेश करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required